Minor Girl Abused after Exam
घारगावः 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने दोन महिन्यांपूर्वी इयत्ता 10 वीचा शेवटचा पेपर दिल्यानंतर तिचे बोलेरो वाहनातून अपहरण करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील पठारभागातील घारगाव पोलिस स्टेशन अंतर्गत एका गावातील ही मुलगी आहे. तिच्यावर तब्बल दोन महिने अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. (Ahilyanagar News Update)
याप्रकरणी 18 मार्च रोजी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार आईने घारगाव पोलिसात दिली होती. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला, परंतू आरोपीसह पिडितेचा तब्बल दोन महिने शोध लावण्यास पोलिसांना अपयश आल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी पिडितेच्या मोबाईलवरुन तिचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईल बंद झाल्याने या घटनेचा तपास थंडावला होता.
दरम्यान, घारगाव पोलिस स्टेशनपासून 15 किलोमीटर अंतरावरील पारनेर तालुक्यातील डोंगरवाडी येथे राहणारा उत्तम भाऊसाहेब डोंगरे (वय 26) हा तरुणदेखील घटनेपासून ‘गायब’ असल्याची चर्चा रंगली होती, परंतू त्याचा मोबाईल बंद असल्याने शोध लागत नव्हता. अखेर गुप्त खबर्याच्या माहितीनुसार आरोपीसह पिडितेचा पोलिसांनी शोध लावला. पोलिस उप निरीक्षक ज्ञानेश्वर मरभळ यांनी उत्तम डोंगरे याला ताब्यात घेवून, अपहृत पिडितेची सुटका केली. पिडितेला मोठे आमिष दाखवून, फूस लावून त्याने बोलेरो वाहनातून पळवून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.