परप्रांतीय व्यापार्‍यांना मारहाण करून लुटले; सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक File Photo
अहिल्यानगर

Ahilyanagar Crime News: परप्रांतीय व्यापार्‍यांना मारहाण करून लुटले; सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक

पोलिस कोेठडीत रवानगी

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: शहरात परप्रांतीय व्यापार्‍यांना वाहनासह पळवून नेऊन मारहाण करीत लुटणार्‍या टोळीतील चार गुन्हेगारांना स्थानिक पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गजाआड करण्यात यश मिळविले. या प्रकरणात सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक झाली असून, काही आरोपी फरारी आहेत. (Ahilyanagar News Update)

अटक झालेल्यांत अंकुश नवनाथ मडके (36), शुभम अंबादास कराड (वय 23), केतन दिगंबर जाधव (व.यय 29, तिघेही रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) आणि सुहास काशिनाथ ढाकणे (34, रा. एडके कॉलनी, पाथर्डी) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे केतन जाधव हा यापूर्वीच खून, अपहरण, दरोडा यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपी आहे.

16 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता उत्तर प्रदेशातील अजयसिंग रजसिंग नायक, सुनीलकुमार छत्तरसिंग नायक आणि यादसिंह बालकिशन नायक हे तिघे पाथर्डीतील शंकरनगर भागात त्यांची मारुती सुझुकी फ्रॉन्क्स (क्र. युपी 77 एयू 2919) गाडीतून वस्तू विक्रीसाठी आले होते. याचवेळी आरोपींनी त्यांना वाहनासह पळवून नेले. व्यापार्‍यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडून रोख रक्कम, दोन मोबाईल फोन, गॅस शेगडी, होम थिएटर, कुलर आदींसह सुमारे 49 हजारांचा ऐवज लुटला. शिवाय, धमकावून 7 हजार 500 रुपये गुगल पे द्वारे वसूल केले.

व्यापार्‍यांना घेऊन आरोपी पळ काढत असताना त्यांच्या वाहनाची नगर रस्त्यावर समोरून येणार्‍या किया कारशी (क्र. एमएच 14 जेआर 3697) जोरदार अपघात झाला. यात वाहनांचे नुकसान होऊन काही प्रवासी जखमी झाले. घटनेनंतर अपघातग्रस्तांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके स्थापन करून शोध मोहीम हाती घेण्यात आली. सर्वप्रथम अंकुश मडके पोलिसांच्या ताब्यात आला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शुभम कराड, केतन जाधव आणि सुहास ढाकणे यांना जेरबंद करण्यात आले.

अटक आरोपींपैकी अंकुश मडके, शुभम कराड, केतन जाधव यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश एस. डी. वाघमारे यांनी त्यांना 20 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील ए. एस. कुलकर्णी यांनी मांडली, तर बचाव पक्षात अ‍ॅड. राणा खेडकर, अ‍ॅड. बबन देवढे, अ‍ॅड. शाहरुख शेख आणि अ‍ॅड. प्रसाद सुपेकर यांनी युक्तिवाद केला.

या गुन्ह्यात चेतन भारत गर्जे व चार अनोळखी असे एकूण पाच आरोपी फरारी असून त्यांचा शोध पोलिसांनी सुरू ठेवला आहे. दरम्यान, लुटलेला माल हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, ही कारवाई पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास जाधव, संदीप ढाकणे, महादेव गुट्टे, निवृत्ती आगरकर, नितीन दराडे, बाबासाहेब बडे, ज्ञानेश्वर इलग, सागर बुधवंत, संजय जाधव, ज्ञानेश्वर सानप, इजाज सय्यद, संदीप बडे, अल्ताफ शेख आणि सुरेखा गायकवाड यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT