NMMS App Problems Pudhari
अहिल्यानगर

NMMS App Problems: आदिवासी भागात रोजगार हमी योजनेला तांत्रिक अडचणींचा विळखा

दोन महिन्यांपासून उपस्थिती नोंदविण्यात अडथळे; मजुरी मिळण्यास विलंब होत असल्याने आदिवासी भागातील मजूर रोजगाराच्या शोधात शहरांकडे

पुढारी वृत्तसेवा

अकोले: ग्रामीण भागातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा, म्हणून राबविण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजनेलाच आता आदिवासी भागात अँपच्या तांत्रिक अडचणींचा विळखा पडला आहे.

मनरेगा योजनेचे नाव बदलून व्हीबी-जी राम जी सुरू केल्यानंतर मजुरांची उपस्थिती नोंदविण्यासाठी वापरण्यात येणारे एनएमएमएस अँप दोन महिन्यांपासून व्यवस्थित चालत नसल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामावर हजर राहण्यासाठी व मजुरी मिळण्यात अडचणी निर्माण होत आहे.

दुसरीकडे रोजगाराचे पर्यायी साधन नसल्याने तालुक्यातील हजारो मजुरांना पुणे, नारायणराव, ओतुर, मंचर, आळे फाटा, चकाण आणि मुंबईकडे स्थलांतर करावे लागत आहे. त्यामुळे रोहयो ही गरीब, भूमिहीन, अल्पभूधारक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार आहे.

तांत्रिक अडचणींमुळे मजुरांना श्रमाचा मोबदला मिळत नसल्याने समस्या आहे. त्यामुळे राज्य शासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने एनएमएमएस अँपमधील तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात, पर्यायी पद्धतीने कामाची पडताळणी करून मजुरांची प्रलंबित मजुरी विनाविलंब अदा करावी, अशी मागणी होत आहे.

वैयक्तिक लाभाची अट नको

व्हीबी-जी राम जी अभियानांतर्गत मजुरांची उपस्थिती दर्शविणारे फोटो काढण्यासाठी दर चार दिवसांनी अँपमध्ये बदल करण्यात येत आहेत व तसे बदल करण्याच्या सूचना येत आहेत. त्यामुळे योजनेचा खेळखंडोबा होत आहे. तर पूर्वी वैयक्तिक लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सिंचन विहिरी व फळबाग लागवड योजनेसाठी मजुरांची उपस्थिती दर्शविण्याची अट नव्हती.

मात्र, आता नवीन अट लागू झाल्याने मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे ती दूर करावी, अशी मागणी मजुरांकडुन करण्यात येत येत आहे. अन्यथा कामावर परिणामाची भीती आहे.

मजुरांना फटका

१९७२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजना सुरू झाली. पुढे केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने मग्रारोहयो राबविण्यात आली.

त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना रोजगाराचा भक्कम आधार मिळाला. मात्र, आता योजनेचे नाव बदलल्यानंतर निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे रोहयोच्या कामांचा कारभार विस्कळित झाला. कामावर हजर असलेल्या मजुरांची छायाचित्रांसह नोंद करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांना एनएमएमएस अँपचा वापर करावा लागतो. परंतु, हे अँपच चालत नसल्याने उपस्थिती नोंदविण्यात अडथळे येत आहेत.

रेंज नसल्याने अडचण

अकोले तालुक्यातील खिरविरे, भंडारदरा, पाचनई, शेणीत, सातेवाडी, रतनवाडी, कुमशेत, धामणगाव, लव्हाळी, पांजरे, ब्राम्हणवाडा, कोलटेंभे, बारी परिसरात रेंज नसल्याने अडचण होत आहे. तर रोजगार हमी योजनेच्या कामावर रोजगार सेवकांना फोटो घेऊन ॲॅपवर आपलोड करताना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे एका रोजगार सेवकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT