जीममधील तरुणांना उत्तेजक नशेच्या औषधांची विक्री Pudhari News Network
अहिल्यानगर

Shrirampur Crime News: जीममधील तरुणांना उत्तेजक नशेच्या औषधांची विक्री

इंजेक्शन विक्री करणार्‍या महिलेसह साथीदाराविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूरः परवाना नसताना जिममध्ये व्यायाम करणार्‍या तरुणांना उत्तेजक नशेच्या मेफेटरिन इंजेक्शन विक्री करणार्‍या महिलेसह साथीदाराविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. शिल्पा शेळके (रा. नॉदर्न ब्रँच, श्रीरामपूर) असे महिलेचे तर, गणेश मुंडे (रा. स्वप्ननगरी, गोंधवणी, श्रीरामपूर) असे साथीदाराचे नाव आहे.

नशेच्या बाटल्यांची विक्री करण्यासाठी ही महिला निळ्या रंगाच्या जुपिटर कंपनीच्या स्कुटीवरुन येणार आहे. नशेच्या बाटल्या स्कुटीच्या डिक्किमध्ये आहेत, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, पोलिस उप निरीक्षक दीपक मेढे, पोलिस काँस्टेबल अंबादास आंधळे, मिरा सरग आदींनी सापळा रचून शेळके या महिलेला रंगेहात ताब्यात घेतले. महिला पोलिसांनी तिची झडती घेतली असता, गाडीच्या डिक्किमध्ये सुमारे 16, 740 रुपये किंमतीचे उत्तजेक इंजेक्शन्स आढळले.

तिच्याकडे औषध खरेदी- विक्रीचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. औषधांची खरेदी बिलेही नव्हते. औषधे ती जिममध्ये पुरवित होती. गणेश मुंडे याच्या साथीने ती विक्री करीत असल्याचे तिने कबुल केले. गुंगी आणणारे व अपायकारक औषधे अवैधरित्या, विना परवाना विना खरेदी बिलाने घेवून विना विक्री बिलाने छापील किमतीपेक्षा जास्त दराने ती विक्री करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शिल्पा बापू शेळके व गणेश मुंडे यांच्याविरुध्द सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

आरोग्यास धोका.. जिवितास हानी .!

पोलिसांनी जप्त केलेले औषधे प्रवर्ग ‘एच’ प्रकारात मोडतात. ती फक्त परवानाधारकाने डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसार विक्री करणे बंधनकारक आहे. औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधाचा मुळ गुणधर्म माहित नसताना, जिममध्ये व्यायाम करणार्‍या तरुणांसह इतर ग्राहकांना विक्री केली जात असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा औषधांच्या सेवनामुळे ग्राहकांच्या आरोग्यासह जिवितास हानी पोहोचण्याची शक्यता आहे. या औषधांचा उपयोग कमी रक्तदाबामध्ये केला जातो, परंतू त्यांचा गैरवापर शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. ही औषधे डॉक्टरांचा सल्ला व निगरानीशिवाय सेवन केल्यास ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवून, जिवितास हाणी पोहचू शकते, अशी माहिती अन्न व औषध अधिकारी मुळे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT