अकोले: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील राजूर येथील भर बाजारपेठेतील महालक्ष्मी हॉटेल आणि किराणा दुकानाला आज (दि. २०) दुपारी भीषण आग लागली. गॅस सिलेंडरची पाईप लिक झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हॉटेलला आग लागल्यानंतर शेजारील मे. चंद्रकांत मेहता किराणा दुकानालाही भीषण आग लागली. तरुणांनी प्रसंगावधान दाखवत आग आटोक्यात आणली. या भीषण आगीत सुमारे ७ लाख ५० हजारांचे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजुर गावात बाळू गणपत बुरुड यांच्या मालकीचे महालक्ष्मी नावाचे हॉटेल आहे. आज दुपारी गॅस सिलेंडरची पाईप लिक झाल्यामुळे आग लागली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. त्यानंतर हॉटेल शेजारी असलेल्या मे.चंद्रकांत मेहता किराणा दुकानात आग पसरली. क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. तरुणांनी पाणी आणून आग बुजविण्याचा प्रयत्न केला. तर घटनास्थळी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता सुरेंद्र घोलप, शिवसेनेचे (उबाठा)चे तालुका अध्यक्ष संतोष मुतडक, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, सरपंच पुष्पाताई निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे, माजी सरपंच गोकुळ कानकाटे, तलाठी अजय साळवे, पोलीस अशोक गाडे, सुधीर ओहरा व ग्रामस्थ, व्यापारी आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
भीषण आगीमध्ये महालक्ष्मी हॉटेलमधील खाद्यपदार्थ व फर्निचर जळाल्याने सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे. तर मेहता किराणा दुकानाचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यामुळे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. पंचनामा मंडल अधिकारी कल्पना भोजणे, तलाठी अजय साळवे यांनी केला.
या दुर्घटनेमुळे राजुरमध्ये हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडताना दिसून आले. राहूल मुतडक, प्रसाद वराडे, संकेत माळवे, टिल्लू पाबळकर, यश हंगेकर, करण हगेकर, दर्शन ओहरा, निखिल मेहता, प्रदिप पवार, झाकीर मणियार, नासीर तांबोळी, फाजाइल मणियार, अमन तांबोळी, इम्रान तांबोळी, शारूख तांबोळी, रजा मणियार, फैजान मणियार, सिद्दिक तांबोळी, लतिफ मणियार आदीसह ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले.