Maratha Reservation pudhari
अहिल्यानगर

Maratha Reservation: मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी नगर जिल्ह्यातून शिधा

जिल्हाभरातून भाकरी चटणी, लोणचे व अन्य खाद्यपदार्थ, पाणी पाठविण्यास सुरुवात झाली

पुढारी वृत्तसेवा

नगर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन सुरू केल्यानंतर आंदोलनकर्त्यांची जेवणाची गैरसोय होत असल्याचे समजल्यानंतर जिल्हाभरातून भाकरी चटणी, लोणचे व अन्य खाद्यपदार्थ, पाणी पाठविण्यास सुरुवात झाली आहे. (Latest Ahilyanagar News)

चांद्यातून 50 खोके पाणी, एक टन फरसाण

चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा येथून पाण्याच्या बाटल्यास तसेच खाद्यपदार्थ भरलेली गाडी मुंबईकडे रवाना झाली. येथील युवकांनी गावातून पाणी बाटल्यांचे 50 खोके, एक टन फरसाण, 2000 बिस्किटपुडे, खजूर 25 किलो फराळी चिवडा, 200 किलो लोणचे, 25 किलो गूळ, 100 किलो शेंगदाणे, 10 किलो चटणी असे पदार्थ एकत्र करत एका वाहनाने मुंबईकडे रवाना केले. गावातील युवकांनी आज दुपारी सोशल मिडियावर मुंबईतील आंदोलकांसाठी पिण्याचे पाणी आणि खाद्य पाठवायचे असा मेसेज केला आणि अवघ्या दोन तासांत एक खाद्यपदार्थ रवाना केले. पुन्हा गरज पडल्यास मदत पाठवणार असल्याचे युवकांनी सांगितले.

सोनईतून शिदोरी रवाना

सोनई : सोनईसह लांडेवाडी व हनुमानवाडी, घोडेगाव येथूनही भाकरी, चपाती, लोणचे, चटणी, पाण्याचे बॉक्स, बिस्किट पुडे, फरसाण व विविध खाद्यपदार्थ घेऊन रविवारी सकाळी परिसरातील वाहनांचे मुंबईकडे प्रस्थान झाले. सोनई परिसरात शनिवारी सायंकाळी आवाहन करण्यात येऊन रविवारी सकाळी हा अन्नपुरवठा पाठवण्यात आला. युवकांनी सोमवारी (दि 1 सप्टेंबर) सकाळी कोरडा शिधा नेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी आवाहन करताच रविवारी 2 तासांत 1 लाख रुपये किंमतीचा गूळ, शेंगदाणे, बेसन पीठ, साखर, चहा पावडर, तेल, तांदूळ, रवा, पोहे, साबुदाणा अशा किराणा वस्तू जमा करण्यात आल्या आहेत.

आंबेडकरी समाजातर्फे शिधा

कोपरगाव : मुंबईतील आंदोलकांसाठी येथील सकल आंबेडकरी समाज, लहुजी वस्ताद चौक व बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनांच्या वतीने मिनरल वॉटर, बिस्कीट, फरसाण व भाकरी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर मराठा बांधवांकडे सुपूर्द करण्यात आला.

श्रीरामपुरातून भाकरी, चटण्या

श्रीरामपूर : येथील मराठा प्रतिष्ठान तसेच मराठा समाजाच्या वतीने 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता जेवणाचे साहित्य, भाकरी, चटण्या, लोणचे, पाण्याच्या बाटल्या, शेव-चिवडा, फळे आदी साहित्य घेऊन ट्रक मुंबईच्या दिशेने रवाना झाला.

करंजीतही लगबग

करंजी : मुंबईत मराठा समाज बांधवांची जेवणाची व पाण्याची गैरसोय होत असल्याची माहिती समजताच जीप-टेम्पोतून प्रत्येक गावातून भाकरी व कोरडा शिधा गोळा करून पाठवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. करंजी, मिरी, तिसगाव परिसरातून रविवारी भाजी भाकरी गोळा करून मुंबईला रवाना केल्या जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT