पाथर्डी: मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून (दि. 27) राष्ट्रीय महामार्ग 61 वर वाहनांची तुफान गर्दी उसळली आहे.
पाथर्डी शहरातून, तसेच नगर जिल्ह्यातून मुंबईकडे निघालेल्या मराठा आंदोलकांची प्रचंड वर्दळ पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग 61 हा मराठा आंदोलनासाठी महत्वाचा मार्ग ठरत आहे. भिवंडीपासून सुरू होणारा हा महामार्ग पाथर्डी-अहिल्यानगर मार्गे थेट तेलंगणाला जोडतो. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागांना हा संपर्क साधणारा रस्ता आहे. (Latest Ahilyanagar News)
त्यामुळे आंदोलक मुंबईकडे प्रस्थान करण्यासाठी या महामार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. विशेषतः ानगर जिल्ह्यातील काही भाग, बीड, परभणी, हिंगोली व नांदेड येथील नागरिकांचा या रस्त्यावरून मोठा वावर होतो. सोमवारी सकाळपासूनच गावागावांतील मराठा आंदोलक शेकडो वाहनांतून या रस्त्यावरून मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे पाथर्डी शहरात, विशेषत: गणेशोत्सवाच्या स्थापनेनिमित्त असलेली गर्दी आणि आंदोलनाची वर्दळ, यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली.
आंदोलकांचा प्रवास अंतरवाली सराटी मार्गे शहागड फाटा, आपेगाव, छत्रपती संभाजीनगर येथील पैठण कमान मार्ग, तसेच नगर जिल्ह्यातील घोटण, शेवगाव, मिरी, पांढरी पूल, नगर बायपास, नेप्ती चौक, आळाफाटा मार्गे सुरू होता. यापैकी अनेक गाड्या थेट शिवनेरी किल्ला मुक्कामासाठी निघाल्याचे दिसून आले.
मनोज जरांगे स्वतः शेवगाव तालुक्यातून हजारो कार्यकर्त्यांसह निघाले असून, त्याच्याशी संलग्न असलेला राष्ट्रीय महामार्ग 61 हा आंदोलनाच्या मुख्य मार्गिकेचे रूप धारण करीत आहे. शेकडो वाहनांच्या ताफ्यांमुळे या महामार्गावर दिवसभर वर्दळ कायम राहिली.वाहतुकीचा मोठा भार पेलावा लागत असल्याने पोलिस प्रशासनालाही मोठ्या प्रमाणावर तैनात राहावे लागले.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियोजन करण्यात आली असले तरी गणेशोत्सव आणि आंदोलनाची गर्दी यामुळे वाहनधारकांना कोंडीचा सामना करावा लागला. मराठा आंदोलकांचा उत्साह आणि निर्धार मुंबईकडे जाणार्या गर्दीने दिसून आला.
भगवेमय वातावरण
ध्वनिक्षेपक, पारंपारिक वाद्य, आंदोलकांच्या गळ्यात भगवे पंचे, टोप्या व वाहनांना लावण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा, तसेच छत्रपती शिवाजी महाराज व मनोज जरांगे यांची छायाचित्रे असलेले बॅनर, पोस्टर प्रत्येक वाहनावर झळकत होते.