नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील 17 हजार 767 मराठा लाभार्थ्यांना राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांमार्फत 1340 कोटींचे कर्ज व 125 कोटी रुपयांचा व्याज परतावा मिळाल्याचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले. मात्र यात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकाही लाभार्थ्याला कर्ज दिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (Ahilyanagar Latest News)
महामंडळाच्या योजनेचा आढावा घेण्यासाठी पाटील बुधवारी (दि.6) नगरला आले होते. त्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, महामंडळ विभागीय समन्वयक पल्लवी मोरे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त रविकुमार पंतम आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, महामंडळामार्फत प्रामुख्याने मराठा समाज व स्वतंत्र महामंडळ नसलेल्या प्रवर्गातील घटकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व्याज परतावा योजना राबवली जाते. स्थापना 1998 मध्ये असली तरी महामंडळाचे काम खर्या अर्थाने 2018 पासून सुरू झाले. महामंडळाने गेल्या सात वर्षांत राज्यातील दीड लाख लाभार्थ्यांना उद्योगासाठी 12 हजार 600 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आणि 1222 कोटी रुपयांचा व्याज परतावा दिला. त्यामुळे आतापर्यंत दीड लाख मराठा उद्योजक झाले. त्यात जिल्ह्यातील सुमारे 18 हजार जणांचा समावेश आहे. मात्र महामंडळाच्या योजना राबविताना राष्ट्रीयीकृत बँकांकडून हलगर्जीपणा होत आहे. सहकारी बँकांकडून सहकार्य मिळते. सातारा जिल्हा बँकेने 5 हजारांहून अधिक जणांना आणि कोल्हापूर जिल्हा बँकेनेही अनेकांना कर्ज दिले; पण 280 शाखा असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने एकालाही कर्ज दिले नाही. याबाबत बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकार्यांना भेटणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील गौतम सहकारी बँकेने 800 पेक्षा अधिक जणांना आणि श्री स्वामी समर्थ सहकारी बँकेने 500 जणांना कर्ज देऊन मराठा उद्योजक घडविण्यास हातभार लावला आहे. खासगी वा व्यापारी बँका वाहनांसाठी कर्ज देत असल्याचे दिसून आले. पण व्यवसायासाठी कर्ज द्या, असे या बँकांना सांगणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील काही नामांकित व्यक्ती एजंटगिरी करीत असून, त्यांच्या कार्यालयात स्व. अण्णासाहेब पाटील यांचे छायाचित्र आहे. ‘आम्ही नरेंद्र पाटील यांच्या ओळखीचे आहोत’, असा भास निर्माण करून ते दहा-दहा हजार रुपये उकळतात. अशा एजंटापासून दूर राहा, असे आवाहन अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे असे मतही त्यांनी व्यक्त केले.