पाथर्डी: तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असताना माणिकदौंडी येथील पटेलवाडा पाझर तलावातील पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तलावात अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा आणि जलसंधारण विभागाने स्वतंत्र पत्रांद्वारे ग्रामपंचायतीला कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रत्यक्ष कारवाई झाली का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
माणिकदौंडी गावासह परिसरातील वाड्या-वस्त्यांसाठी पटेलवाडा तलाव महत्त्वाचा जलस्रोत आहे. मात्र, रात्रीच्या वेळी वीजपंप लावून, तसेच टँकरद्वारे तलावातील पाणीउपसा केला जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. काहीजण या पाण्याची विक्री करीत असल्याचाही आरोप आहे. उपसा असाच सुरू राहिल्यास आगामी काळात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी ११ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर उपअभियंत्यांनी १२ मे रोजी ग्रामपंचायतीला पत्र पाठवून जलजीवन मिशनअंतर्गत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून ५०० मीटर परिसरात अनधिकृत कूपनलिका अथवा विहिरी खोदण्यास प्रतिबंध असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन अधिनियम २००९ नुसार संबंधितांवर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते.
दरम्यान, आपले सरकार पोर्टलवर दाखल तक्रारीत तलावासाठी संपादित जमिनीवर अतिक्रमण करून सुमारे २५ अनधिकृत विहिरी खोदल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग, नेवासा यांनी २५ जून २०२६ रोजी ग्रामपंचायतीला पत्र पाठविले. या पत्रात तलावातील अनधिकृत पाणी उपसा तातडीने बंद करण्याचे, तलावाच्या जमिनीची भूमिअभिलेख विभागामार्फत मोजणी करून हद्द निश्चित करण्याचे आणि अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अनधिकृत विहिरींवर नियमानुसार कारवाई करून तलाव क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणला सूचना देण्याबाबतही नमूद केले आहे.
मात्र, दोन विभागांची पत्रे निघूनही अनधिकृत विहिरींवर कारवाई झाली का, तलावाची मोजणी करण्यात आली का, वीजजोडण्या खंडित केल्या का आणि पाणी उपसा थांबला का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. एकीकडे तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू असताना गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावरच अनधिकृत उपसा होत असल्याचा आरोप आहे. तलावातील उर्वरित पाणीसाठा संपल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने कारवाई करावी आणि कार्यवाहीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी होत आहे.