Malegaon Farmers Water Protest Pudhari
अहिल्यानगर

Malegaon Farmers Water Protest: ‘पाणी आणि शेतकरी हाच आमचा पक्ष!’; हक्काच्या पाण्यासाठी माळेगाव-नेकरांचा ताजनापूर प्रकल्प कार्यालयावर घेराव

सहा महिन्यांपासून पॅनल बॉक्सचे काम रखडले; सात पाणलोट क्षेत्रांत तातडीने पाणी सोडण्याची मागणी, तोडगा निघेपर्यंत ठिय्या आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

शेवगाव: ना पक्षाचा झेंडा, ना नेत्याचा फोटो... पाणी आणि शेतकरी हाच आमचा पक्ष! असा संतप्त हुंकार भरत माळेगाव-ने येथील शेतकरी, महिला व युवकांनी सोमवारी ताजनापूर मध्यम प्रकल्प क्रमांक १च्या कार्यालयावर धडक देत घेराव घातला. सहा महिन्यांपासून पॅनल बॉक्सचे काम रखडले असताना अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हक्काचे पाणी मिळत नसल्याचा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. पाणी मिळाल्याशिवाय उठणार नाही; गरज पडली तर इथेच मुक्काम ठोकू, असा थेट इशारा देत आंदोलकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

एकीकडे पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, तर दुसरीकडे धरणात पाणी उपलब्ध असतानाही माळेगाव-नेच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे.

माळेगाव-ने परिसरातील इनाम पाणलोट, खबडा पाणलोट, मोळाचा ओढा, शिप्याच्या झऱ्यापासूनचे पाणलोट, खडखडीचे पाणलोट, वाघिनीचे पाणलोट आणि हाडुळा येथील पाणलोट अशा सात पाणलोट क्षेत्रांतील बंधाऱ्यांमध्ये तातडीने पाणी सोडावे, तसेच वर्षातून किमान सहा वेळा धरणातील पाण्याने, ही पाणलोट क्षेत्रे भरून द्यावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

‘ताजनापूर लिफ्ट योजने’चे जनक ॲड. शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ज्या माळेगाव-ने गावाने ताजनापूर योजनेसाठी संघर्ष केला, त्याच गावाला आज पाण्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, ही प्रशासनाची शोकांतिका आहे, असा आरोप ॲड. काकडे यांनी केला.

धरण भरलेले असताना नदीद्वारे पाणी सोडले जाते; मात्र माळेगाव-नेच्या शेतीसाठी आणि दुग्ध व्यवसायासाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाणी असूनही शेतकऱ्यांच्या नशिबी तहान, अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. कामाला सहा महिने लागतात, मग शेतकऱ्याने पिके कशी जगवायची? अधिकारी फाईल हलवतात, पण शेतकऱ्याच्या शेतातील पिके मात्र डोळ्यादेखत जळत आहेत, असा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला.

सकाळी साडेअकराच्या सुमारास सुरू झालेल्या आंदोलनात अभंग, गवळणी, लोककला आणि आक्रमक भाषणांच्या माध्यमातून जलसिंचन विभागाच्या कारभाराचा समाचार घेण्यात आला. कार्यालय परिसरात शेतकरी, महिला आणि युवकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

ज्येष्ठ नेते जगन्नाथ गावडे, उपसरपंच रामभाऊ भालेराव, आजीनाथ सुडके, माजी सरपंच पंढरीनाथ सुडके, सुमन गावडे, वच्छला घोरपडे, चंद्रकांत भिसे, नवनाथ जवादे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, महिला व युवक आंदोलनात सहभागी झाले.

आंदोलक राधाबाई गायकवाड यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, पाण्यासाठी माझ्या सासरच्या मंडळींनी, नवऱ्याने आणि मुलाने आयुष्यभर संघर्ष केला. लग्न करून या गावात आले तेव्हापासून प्रत्येक आंदोलनात सहभागी झाले. आता आम्ही वृद्ध होत चाललोय; तरीही गावात पाणी आले नाही. आमच्या पुढच्या पिढीनेही पाण्यासाठीच आंदोलन करायचे का?”

तोडगा निघेपर्यंत कार्यालय सोडणार नाही

आंदोलनावर तातडीने ठोस तोडगा न निघाल्यास कार्यालयासमोरच मुक्काम ठोकण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष पाणी सोडण्याची कार्यवाही करा, अशी संतप्त मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT