

नेवासा: राज्यातील प्रशिक्षित होमगार्डना आता पोलिस वाहनांचे चालक म्हणून नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विविध पोलिस घटकांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार १ हजार १५० वाहनचालक होमगार्ड तैनात करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण २ हजार ३०० होमगार्डना चार आठवड्यांचे वाहनचालक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात १ हजार १५० होमगार्ड सहा महिन्यांसाठी पोलिस घटकांमध्ये तैनात केले जातील. विशेषतः म्हणजे यात आहिल्यानगर जिल्ह्यासाठी १०० होमगार्ड चालक मिळाल्याने जिल्हा पोलिस दलाला मोठी मदत होमगार्ड जवानांची होणार आहे.
गृह विभागाने गेल्या ३० जून रोजी दिलेल्या मान्यतेनंतर पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील पोलिस घटकांना आवश्यक असलेल्या वाहनचालक होमगार्डची माहिती मागविली होती. त्यानुसार राज्यातील पोलिस घटकांकडून एकूण १ हजार ९०५ वाहनचालक होमगार्डची आवश्यकता असल्याचे कळविण्यात आले. मात्र, प्राप्त मागणीच्या अनुषंगाने महासमादेशक होमगार्ड यांनी पहिल्या टप्प्यात १ हजार १५० होमगार्ड तैनात करण्यास मान्यता दिली आहे.
एकूण २ हजार ३०० होमगार्डना चार आठवडचांचे प्रशिक्षण वाहनचालक म्हणून तैनात करण्यात येणाऱ्या होमगार्डना संबंधित पोलिस घटक प्रमुखांच्या समन्वयाने चार आठवडचांचे आवश्यक वाहनचालक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या होमगार्डना प्रशिक्षण कालावधीत भोजन भत्ता आणि खिसाभत्ता अनुज्ञेय राहणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कर्तव्यावर उपस्थितीनुसार त्यांना नियमानुसार कर्तव्यभत्ता दिला जाणार आहे. या निर्णयामुळे पोलिस दलावरील वाहनचालकांची कमतरता काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार असून, प्रशिक्षित होमगार्डच्या कौशल्याचा पोलिस कामकाजासाठी उपयोग केला जाणार आहे.
सहा महिन्यांचा खंड देऊन दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १ हजार १५० प्रशिक्षित होमगार्डना पुढील सहा महिन्यांसाठी तैनात करण्यात येणार आहे. अशा प्रकारे एक वर्षाच्या कालावधीत दोन टप्प्यांत एकूण २ हजार ३०० प्रशिक्षित होमगार्डना संधी मिळणार आहे. यामुळे एक नवीन संधी जिल्ह्यातील होमगार्ड जवानांना मिळाली म्हंटल तर वावगं ठरणार नाही.
डायल ११२ वाहनांवर होणार नियुक्ती
पोलिस दलाच्या दैनंदिन कामकाजात रात्र गस्ती, बंदोबस्त, तपास, आरोपींची ने-आण, घटनास्थळी तातडीने पोहोचणे, बिट मार्शल, व्हीआयपी बंदोबस्त,डायल ११२ अश्या विविध कामासाठी वाहन चालकांची भूमिका महत्वाची असते. मात्र अनेक पोलिस घटकांमध्ये वाहनचालकांची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १०० प्रशिक्षित होमगार्डना वाहनचालक म्हणून संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्हा पोलिस विभागाला प्रशिक्षित मनुष्यबळ मिळण्यासोबतच होमगार्ड विभागाला चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
होमगार्ड जवान नेहमीच पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. यापुढे पोलीस वाहनचालक म्हणून प्रशिक्षित होमगार्डला घेण्याचा निर्णय नक्की आमच्या साठी एक मोठी संधी आहे आणि यासंधीच आम्ही सोनं करू.
सुनील गाढवे, प्रशिक्षित वाहन चालक, होमगार्ड, नेवासा