Sugarcane Pudhari
अहिल्यानगर

Sugarcane Crushing Season: ‘यंदा क्षेत्र मोठे, पण उत्पादन कमीच’; पाऊस नाही, उसाची वाढ नाही, उत्पादन घटणार

सरकारने १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याची घोषणा केली असली तरी अपरिपक्व ऊस, कमी वाढ आणि कोरड्या स्थितीमुळे हंगाम लांबण्याची शक्यता.

पुढारी वृत्तसेवा

नगर: राज्यासह जिल्ह्यातही यंदा पाऊस नाही, अलनिनोचा दिसलेला हा प्रभाव, कोरडे पडलेले जलस्त्रोत, त्यातच वाढती रोगराई, यामुळे ऊस उत्पादनात फटका बसणार आहे.

दरम्यान, सरकारने 15 ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचे जाहीर केले, मात्र ऊस अपरिपक्व आहे, वाढ झालेली नाही, कांड्यांमध्ये साखर तयार नाही, कारखानदारही नोव्हेंबरवर अडून बसलेले आहेत. त्यामुळे यावर्षीचा गाळप हंगाम कदाचित नोव्हेंबरमध्ये सुरू केला जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे.

राज्यात साधारणतः 15 नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू होत असे. मात्र, यावर्षी वाढलेले साखरेचे दर लक्षात घेता सरकारने महिनाभर अगोदरच दि. 15 ऑक्टोबरपासूनच गाळप हंगाम सुरू करण्याची घोषणा केली आहे. यावर्षी साधारणतः 14 लाख हेक्टर क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध असेल, असा अंदाज आहे.

दसऱ्यानंतरच ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या फडात उतरत असल्याने यावर्षी दसरा हा 20 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबरला गाळप सुरू होण्याची शक्यता कमी आहे. दि. 1 नोव्हेंबर नंतरच खऱ्याअर्थाने गाळपाला वेग येणार आहे.

दुसरी बाजू म्हणजे, शेतात ऊस अपरिपरक्व व कोवळा ऊस असणार आहे. त्यामुळे साखर उताराही एक ते दोन टक्कयांनी कमी होऊन नुकसान होण्याची भिती आहे. जिल्ह्यात सहकारी व खासगी असे 21 साखर कारखाने कार्यरत आहेत. या कारखान्यांकडून यंदाच्या गाळपासाठी तयारी सुरू आहे. त्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रातील उसाचा शेतकी विभागाकडून आढावा घेतला जात आहे.

नोंदी घेतल्या जात आहेत. तर, कृषी विभागाकडूनही उसाचे अंदाजीत क्षेत्राचा अहवाल साखर संचालक विभागाकडे पाठविण्यात आलेला आहे.

कृषी विभागाची नोंद, साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांनी केलेल्या नोंदी यांच्या संयुक्त अहवालानुसार जिल्ह्यातील ऊसाच्या क्षेत्राचा अंदाज बांधला जातो. कृषी विभागाच्या नजर अंदाजानुसार 1 लाख 38 हजार हेक्टरवर ऊस गाळपासाठी उभा आहे.

मात्र, एकाच शेतकऱ्याने वेगवेगळ्या कारखान्यांकडे आपल्या उसाची नोंद केलेली असल्याने, साखर कारखान्यांकडे तब्बल 2 लाख 25 हजार हेक्टरची नोंद झाली आहे. त्यामुळे नोंदीचे आकडे काहीही सांगत असले तरी यावर्षी जास्तीत जास्त सव्वा ते दीड लाख हेक्टरच्या मधेच गाळप क्षेत्र असणार आहे.

पाऊसच नाही, साखर उताऱ्याचे काय?

यंदा पायरी रोगामुळे ऊस उत्‍पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ड्रोन फवारणीसाठी खिशाला मोठी झळ बसली आहे. त्यात, गेल्या महिन्याभरापासून पाऊसच नसल्याने उसाचे फड पाण्याअभावी ताणले आहेत. परिणामी, उसाची वाढ खुंटली आहे, कांड्या वाढलेल्या नाहीत, त्यात साखरही अपेक्षित तयार झालेली नाही. त्यामुळे उत्पादन घटणार हे स्पष्टच असून, साखर उतारा देखील घसरण्याची भीती कायम आहे.

नगरमध्ये दीड लाख हेक्टर ऊस

जिल्ह्यात 1 लाख 69 हजार 728 हेक्टरवर उसाचे क्षेत्र उपलब्ध असून, यातून सुमारे 1 कोटी 52 लाख मे.टन गाळप होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, यंदा उसाचे क्षेत्र समाधानकारक असले तरी उत्पादनाचे गणित मात्र पाऊस, उसाची वाढ, खोडव्याचे प्रमाण आणि साखर उतारा यावरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम ‘क्षेत्र मोठे, पण उत्पादन कमी’ असा राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT