Dattatray Bharne Pudhari
अहिल्यानगर

Maharashtra Petrol Diesel News: राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका: कृषीमंत्री भरणे

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश; कर्जमाफीचा निर्णय 30 जूनपर्यंत होणार

पुढारी वृत्तसेवा

नगर: राज्यात दररोज पेट्रोल-डिझेलचा 20 टक्के खप वाढला आहे. मात्र, कुठेही पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही. मात्र, काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. काही ठिकाणी पंपचालक शेतकऱ्यांना डिझेलसाठी सातबारा उताऱ्याची मागणी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्या पंप चालकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्याना दिले आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्यस्तरीय शब्दबंध साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज आहे. यंदा अल निनोचे संकट असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अद्याप हा केवळ अंदाज आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नुकतीच बैठक झाली. राज्यात खते व बियाण्याचा तुटवडा नाही. खतांचा पुरेसा साठा आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेेले आवंट मिळण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. अल निनोचे संकट पाहता कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना देणे आणि बंधाऱ्यांची डागडुजी करणे याला प्राधान्य दिले आहे.

दोन दिवसांत राज्यात वादळी पावसाने फळबागांचे मोठे नुकसान झाल्याबाबत ते म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यातील कृषी विभाग आणि महसूल विभागाला पंचनामे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. पेट्रोल व डिढेल संपल्याची नुसती अफवा आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये.

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

राज्यामध्ये बोगस बी-बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून संबंधित दुकानदारांचे लायसन्स रद्द करण्यात येतील. शेतकऱ्यांची फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असे मंत्री भरणे यांनी सांगितले.

कर्जमाफी लवकरच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली असून 30 जूनपर्यंत याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. कर्जमाफीसंदर्भातील अहवाल राज्य सरकारकडे सादर झाला असून लवकरच दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली जाईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

‌‘कॉकरोच‌’ची भीती वाटत नाही

सोशल मीडियावर जोर धरलेल्या कॉकरोच जनता पार्टीची राजकारण्यांना भीती वाटते का, असे विचारले असता ते म्हणाले, राजकारण वेगळे आणि सोशल मीडियावर चळवळ उभी करणे वेगळे आहे. कॉकरोच जनता पार्टीवाल्याने राजकीय अजेंडा नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्याची कोणत्याही पक्षाला भीती वाटण्याचे कारण नाही. यश आणि अपयशाच्या गोष्टी निवडणुकीत कळतात, आता नाही; अशी टिप्पणीही मंत्री भरणे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT