नगर: महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचा दि. 6 ते 8 ऑगस्टदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्याचा तीन दिवसीय दौरा जाहीर झाला आहे. या दौऱ्यात समिती प्रमुखासह 28 आमदारांचा समावेश असून, त्यांची ही समिती विविध शासकीय विभागांच्या गत पाच वर्षातील योजना, प्रकल्प, निधी आणि विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.
या दौऱ्यात पाच वर्षांतील दूध भेसळीच्या कारवाया, क्रीडा विभागातील साहित्य खरेदी, क्रीडांगण योजनेवर झालेला खर्च, सार्वजनिक बांधकामचा खड्डे दुरुस्तीचा निधी, जलजीवनवरील खर्च अन् पूर्ण योजना, इत्यादींवर समिती माहिती घेऊन अहवाल सादर करणार आहे.
समितीचा दौरा हा 20 ते 22 जुलै दरम्यान जाहीर झाला होता. मात्र ही समिती सन 2021 ते 2026 या कालावधीतील योजनांची माहिती अभ्यासणार असल्याने, ती माहिती तत्काळ संकलित करणे प्रशासनापुढे आव्हान होते. याबाबतचा तसा सूर पुढे आल्यानंतर हा दौरा तूर्त स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर आता दि. 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान ही समिती नगर दौऱ्यावर येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली २७ आमदार, सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी व स्वीय सहाय्यकांसह सुमारे ५० सदस्यांचे पथक जिल्ह्यात दाखल होणार आहे.
दि. ६ ऑगस्ट रोजी विभागप्रमुखांसोबत आढावा बैठक होणार असून, त्यानंतर विविध प्रकल्पांना भेटी दिल्या जातील. दि. ७ व ८ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष कामांची पाहणी करून समिती संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना करणार आहे.
दौऱ्याच्या अनुषंगाने प्रत्येक आमदारासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात येणार असून, सर्व विभागांना आवश्यक माहिती व कागदपत्रांचे संच तयार ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.