पाथर्डी: श्रीक्षेत्र मढी येथे फुलोरबाग यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो कावडधारकांनी पवित्र जलाने चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीस अभिषेक केला. ‘गंगामाई की जय, हरहर महादेव, अलख निरंजन, चैतन्य कानिफनाथ महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदमला.
चैतन्य कानिफनाथ यात्रेचा शेवटचा टप्पा पारंपरिक उत्साहात व शांततेत पार पडला. बुधवारी सायंकाळी निशाण भेटीचा वैशिष्ट्यपूर्ण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. विश्वस्त समितीच्या नियोजनामुळे यंदा कावडधारकांना कोणताही त्रास न होता जलाभिषेक करता आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
फुलोरबाग हा यात्रेतील अंतिम टप्पा असून मढी परिसर जयघोष व डफ-ताशांच्या निनादाने दुमदुमला. निवडुंगे शिवारात यात्रा संपल्यानंतर मानाची निशाणे व कावडी लक्ष्मी आई मंदिराजवळ आणण्यात आली. त्याचवेळी गडावरून पंचधातूचा प्रतिकात्मक घोडा व पालखी निशाण भेटीसाठी दाखल झाली. निशाणाचे टोक पालखीला स्पर्श होताच भाविकांनी जयजयकार करत वातावरण भारावून टाकले.
तेलंगणातील बंजारा समाजाने निशाण भेटीदरम्यान पारंपरिक नृत्य सादर करत सेवा अर्पण केली. यात्रेनिमित्त विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. रेवडी-फुटाणे प्रसाद, मिठाई, फरसाण, तसेच कृषी अवजारे, वनौषधी व पूजासाहित्याची खरेदी झाली. एसटी प्रशासनाने अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून दिली.
दरम्यान, वाढत्या गर्दीत खिसेकापू, मोबाईल चोरी व महिलांच्या दागिन्यांची चोरी असे प्रकार घडल्याने गुन्हेगारीचे सावट कायम असल्याचे दिसून आले. तसेच खराब रस्त्यांमुळे व वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली.
देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, सरचिटणीस माधुरी मरकड, चिटणीस अनिल साठे, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड, विश्वस्त उत्तम मरकड, मदन मरकड कार्याध्यक्ष महादेव कोकाटे, उषा मरकड, पुण्याचे उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, देविदास मरकड, प्रदीप पाखरे, आदिनाथ पाखरे, बाळासाहेब मरकड, कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यात्रेनंतर बहुसंख्य भाविक मायंबा येथे चैतन्य मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीच्या विधीसाठी रवाना झाले.