करंजी: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे तीन दिवसीय यात्रा उत्सव होत असून, या यात्रोत्सवाला शनिवार (दि. 17)पासून प्रारंभ झाला आहे. रविवारी (दि. 18) यात्रेचा मुख्य दिवस त्याचबरोबर अमावस्याही असल्याने भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे तिसगावसह मढी, देवराई, सावरगाव घाट असे सर्व मुख्य रस्ते वाहतुकीने ठप्प झाले.
यात्रेचा मुख्य दिवस असल्याने तिसगाव येथे सकाळी आठ वाजल्यापासूनच मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. पोलिस कर्मचारी सकाळपासून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत असले, तरी तिसगाव ते मढी, मढी ते मच्छिंद्रनाथ गडाकडे जाणारा रस्ता, त्याचबरोबर मच्छिंद्रनाथ देवस्थान ते सावरगाव घाट, वृद्धेश्वर-देवराई रस्ता, तिसगाव ते शिरापूर या सर्व रस्त्यांवर भाविकांच्या वाहनांची मात्र मोठी रांग लागली होती.
मच्छिंद्रनाथ यात्रोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र मढी, श्रीक्षेत्र वृद्धेश्वर, श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान या ठिकाणी देवदर्शनासाठी भाविकांची अक्षरशः रीघ लागली होती. तिसगाव येथील अनेक तरुण सामाजिक कार्यकर्ते यांनीही रस्त्यावर उतरून भाविकांच्या वाहनांना वाट मोकळी करून दिली.
रविवारी दिवसभर तिसगाव येथे शेवगाव रोड चौक, वृद्धेश्वर चौकासह भाविकांच्या वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. तिसगाव येथील वाहतूक कोंडीत दोन रुग्णवाहिका अडकल्या होत्या. मात्र, स्थानिक तरुण व पोलिसांच्या मदतीने या रुग्णवाहिकांना तत्काळ वाट मोकळी करून देण्यात आली. युवा नेते कुशल भापसे, चेअरमन धीरज मैड, नवनाथ मरकड, भैया बोरुडे, अरिफ तांबोळी, महेश लवांडे, सुनील लवांडे, प्रदीप ससाने, सचिन खंडागळे, शेरखान शेख, मोहसीन शेख यांच्यासह अनेक सामाजिक तरुणांनी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केला.
कंडक्टर बनला वाहतूक पोलिस!
तिसगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या. सकाळी येथे पोलिस उपलब्ध नसल्यामुळे बीड एसटी डेपोच्या कंडक्टरला रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करावी लागली. कंडक्टरने वाहतूक पोलिसाची भूमिका बजावल्याने भाविकांना काहीसा दिलासा मिळाला.