Emotional Story of Dog Mourning Cow's Death in Maharashtra
अमोल गव्हाणे
श्रीगोंदा : प्रेम, आपुलकी आणि ऋणाची जाणीव ही माणसांपुरती मर्यादित असते, असे आपण समजतो. पण काष्टी गावातील एका छोट्याशा वस्तीवर घडलेली घटना हे समज खोटे ठरवणारी ठरली. दांगट वस्तीतील किरण चंद्रकांत दांगट यांच्या घरातील ‘टिफ्या’ नावाचा एक श्वान, वय वर्षे 3, हा लहानपणापासून त्यांनी पाळलेल्या गायीच्या दुधावर वाढलेला. ती गाय म्हणजे त्याच्या आईसमान होती. मात्र दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी ही गाय आजारी पडून मरण पावली.
गायीच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदण्यासाठी जेसीबी मशीन बोलावण्यात आले. जेव्हा मशीन सुरू झाले, तेव्हा टिफ्या धावत धावत मशीन मागे गेला. शेतात नेलेल्या गायीच्या आसपास तो बसून राहिला. त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते. त्या मुक्या प्राण्याचे दुःख, प्रेम आणि वेदना डोळ्यांतून व्यक्त होत होते.
जेव्हा गायीला दफन करण्यासाठी खोल खड्ड्यात टाकण्यात आले, तेव्हा टिफ्या त्या खड्ड्यात झेप घेण्याचा प्रयत्न करू लागला. खड्डा खोल असल्याने तो उडी मारू शकला नाही; पण तिच्याभोवती गोल गोल फिरत राहिला. जेव्हा माती टाकण्यास सुरुवात झाली, तेव्हा त्याने देखील तोंडाने माती ढकलण्यास सुरुवात केली! हे दृश्य पाहून उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले.
हा प्रसंग संपूर्ण वस्तीच्या हृदयात घर करून गेला. एका श्वानाने माणुसकी, ऋणाची जाणीव आणि निःस्वार्थी प्रेम म्हणजे काय असते, हे दाखवून दिले.
जिच्या दुधावर वाढलो, तिच्या शेवटच्या प्रवासात माती देतोय या भावना शब्दांनी नाही, तर कृतीतून व्यक्त करत टिफ्याने जणू मूक भाषेत एक अमोल संदेश दिला. प्रेम व्यक्त करण्यासाठी वाचा लागत नाही, भावना पुरेशा असतात.
किरण दांगट म्हणाले ही गाय आमच्या घरीच लहानाची मोठी झाली. गेल्या तीन वर्षांपासून टिफ्या नावाचा श्वान या गायीच्या सहवासात लहानाचा मोठा झाला. गायीच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबीयासह टिफ्याही व्यथित झाला. गाईवर अंत्यसंस्कार होईपर्यंत तो थांबून होता.
आपल्यावर ज्यांचे उपकार असतात त्याची जाणीव ठेवणारे खूप कमी झालेले आहेत. परंतु टिप्या श्वान असूनही याला अपवाद ठरला. तीन वर्षे ज्या गायीच्या दुधावर मोठा झाला, वाढला, त्याच दुधाच्या उपकाराची जणू काही फेड केली.. आजारपणात गायीजवळ बसून राहणारा आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्या अंतिम विधीच्या ठिकाणी जाऊन तिला माती देताना टिफ्या श्वान पाहिला आणि तिथे उपस्थित असणार्या सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. कुठेतरी मुक्या प्राण्यांनादेखील भावना मान असल्याची जाणीव झाली. मुक्या प्राण्यांना वाचा नसते; पण भावना मात्र खूप असतात, अशी भावना या वेळी प्राणिमित्र संतोष जठार यांनी व्यक्त केली.