राहुरी: मुळा धरणातून जायकवाडीच्या दिशेने सुरू असलेला विसर्ग अखेर थांबला. शासकीय जलाशय परिचलन आदेशानुसार पाणीसाठा 69.23 टक्के (15 जुलै ते 31 जुलै) राखणे महत्त्वाचे असल्याने विसर्ग थांबविण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. धरणाच्या लाभक्षेत्रासह पाणलोट क्षेत्रावर पावसाने दडी मारल्याने आवकेत घट झाली आहे. केवळ 1633 क्यूसेक इतकीच आवक धरणाकडे होत आहे.
मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेले कोतूळ, पांजरे, हरिश्चंद्रगड परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. बुधवारी (16 जुलै) सायंकाळी 6 वाजता मुळा धरणात कोतूळ येथील लहित खुर्द मुळा सरिता मापन केंद्रावर केवळ 1633 क्यूसेक प्रवाहाची नोंद दिसून आली. त्यामुळे विसर्ग थांबविण्यात आला आहे. धरणसाठा 18 हजार 226 दशलक्ष घनफुटांवर स्थिर असून डाव्या कालव्यातून 150 क्यूसेक तर उजव्या कालव्यातून 900 क्यूसेक इतका प्रवाह सिंचनासाठी सुरू आहे.
मुळा धरणातून 9 जुलैपासून 3 हजार क्यूसेक ते 1 हजार क्ूयसेक या प्रमाणात जायकवाडीच्या दिशेने पाणी वाहत होते. धरणातून जायकवाडीच्या दिशेने सुमारे 900 दलघफू पाणी वाहिल्यानंतर सर्व 11 दरवाजे बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी घेतला.