राहुरीमध्ये बिबट्याने पाडला 200 जनावरांचा फडशा! Pudhari File Photo
अहिल्यानगर

Leopard Attack: राहुरीमध्ये बिबट्याने पाडला 200 जनावरांचा फडशा!

दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन; तालुक्यात दहशतीचे सावट

पुढारी वृत्तसेवा

रियाज देशमुख

राहुरी: राहुरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. शेतकर्‍यांना रात्रीचं नव्हे, तर अगदी दिवसा ढवळ्या ही बिबट्या अचानक दर्शन देत असल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बारागाव नांदूरमध्ये भरवस्तीत बिबट्याने एकास धडक दिल्यामुळे मोठी दहशत पसरली आहे.

राहुरी परिसरामध्ये वन विभागासह महात्मा फुले कृषी विद्यापीठ व मुळा धरण वन क्षेत्रासह फळ बागांमध्ये शेकडो बिबट्यांचे वास्तव्य आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्याने थैमान मांडले आहे. देवळाली प्रवरा, मानोरी, बारागाव नांदूर, टाकळीमिया, उंबरे, वडनेर, तांभेरे, वांबोरी, पिंपळगाव फुणगी, कुरणवाडी आदी परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले वाढल्याचे वास्तव दिसत आहे. इतकेच नव्हे तर, थेट राहुरी शहरातही बिबट्याने संचार केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Latest Ahilyanagar News)

राहुरी परिसरामध्ये गेल्या चार महिन्यांमध्ये बिबट्याकडून, एक मानवी हल्ला तर, तब्बल 165 ठिकाणी हल्ले करीत, जनावरांचा अक्षरशः फडशा पाडला आहे. सुमारे 200 जनावरांना भक्ष्य करीत, बिबट्याने दहशत पसरविली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मानोरी गावामध्ये बिबट्याने गायीचा फडशा पाडल्याची घटना घडत नाही, तोच बारागाव नांदूर गावामध्ये असलम पिरजादे यांच्या मालकिच्या 5 शेळ्यांवर बिबट्याने येथेच्छ ताव मारला. तब्बल 4 शेळ्या मृत तर, एक अत्यवस्थ झाली. या घटनेचा वन कर्मचार्‍यांनी पंचनामा केला होता.

बारागाव नांदूर ग्रामस्थ दहशतीच्या सावटात असतानाच, बिबट्याने पुन्हा, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी 7 वाजता मानवी वस्तीमध्ये प्रवेश केला. लहान मुले खेळत असताना बिबट्या झाडावर चढला होता. मुलांनी आरडा-ओरड केल्यानंतर बिबट्याने झाडावरून लगतच्या शेतामध्ये धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

तत्पूर्वी सायंकाळी 6 वाजता बिबट्या बारागाव नांदूरमधीतील दावल मलिक देवस्थानकडे जाणार्‍या डाव्या कालव्यालगतच्या रस्त्यावर 15 मिमिटे अगदी रुबाबात थांबा घेऊन उभा होता. यामुळे येणार्‍या- जाणार्‍या वाहन चालकांसह शेतकर्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. काही वेळेनंतर बिबट्याचा दुसरा सवंगडी तेथे आला. ही मोबाईल रेकॉर्डिंग तोसीफ इनामदार व रहेमान इनामदार यांनी, वन विभागाकडे पाठविली आहे. यानंतर वन पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.

मानोरी, देवळाली प्रवरा, उंबरे, ब्राम्हणी परिसरामध्ये बिबट्याचे सतत दर्शन होत असल्याच्या अनेक घटना घडल्या. बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरूच आहेत. थेट मानवी वस्त्यांपर्यंत बिबट्याचा संचार वाढला आहे.

राहुरीत अवघे 18 पिंजरे!

बिबट प्राणी पकडण्यासाठी राहुरी तालुका वन विभागाने 30 पिंजरे आणले आहेत. यापैकी 12 नादुरुस्त, तर उर्वरीत 18 पिंजर्‍यांद्वारे बिबट्यांना पकडण्याचे प्रयोजन केले जाते. राहुरी तालुक्यात सुमारे 250 पेक्षा अधिक बिबट्याचे वास्तव्य आहे, अशी माहिती वन अधिकार्‍यांनी दिली आहे.

‘गेल्या चार महिन्यात राहुरी तालुक्यामध्ये 162 पेक्षाअधिक ठिकाणी बिबट्याने हल्ले करीत जनावरांचा फडशा पाडला आहे. एका ठिकाणी मानवी हल्ल्याची नोंद झाली आहे. मानवी हल्ल्यातील मृत व्यक्तीला शासनाने 25 लाख रुपयांचा मदत निधी दिला आहे. जनावर हल्ल्यातील 15 प्रकरणे मंजूर होऊन, 1 लाख 25 हजार रुपये निधी वितरीत केला आहे. 147 प्रकरणे शासनस्तराव प्रलंबित आहेत.
- ज्ञानेश्वर साळुंके, राहुरी तालुका वन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT