BJP vs NCP Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Legislative Council Election: अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; महायुतीत उमेदवारीवर सस्पेन्स कायम

नगरच्या जागेसाठी भाजप–राष्ट्रवादीत रस्सीखेच; अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

नगर: विधान परिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारपासून (दि. 25) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. महायुतीत नगरच्या जागेवरील दावा राष्ट्रवादीने सोडलेला नसला तरी, ही जागा भाजपच लढणार असल्याचा कार्यकर्त्यांना विश्वास आहे. मात्र उमेदवार कोण असेल, याचा ‌‘सस्पेन्स‌’ अजूनही कायम आहे. डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यासह सत्यजित कदम, भानुदास बेरड यांची नावे चर्चेत असली, तरी ऐन वेळी प्राजक्त तनपुरे की अन्य एखाद्या ‌‘दिग्गज‌’ नेत्याचा भाजपप्रवेश घडवून जिल्ह्याच्या राजकारणात परिवर्तन घडवून आणले जाणार, याविषयीही अंदाज बांधले जात आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या एका जागेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुरुवातीला महायुतीत शिवसेनेनेही नगरच्या जागेवर दावा केला होता. मात्र, आता सेना मागे पडल्याचे वास्तव आहे. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कितीही ‌‘नगरचा दावा सोडला नाही‌’ म्हणत असले तरी भाजपने ही जागा केव्हाच त्यांच्याकडून काढून घेतल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. ‌‘आमचा आग्रह कायम आहे,‌’ असे चार दिवसांपूर्वी म्हणणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत हेही आता ‌‘महायुती जो निर्णय घेईल तो स्वीकारू!‌’ असे म्हणत आहेत; त्यातच सारे आले.

भाजपकडून इच्छुकांची संख्या कमी नाही. डॉ. राजेंद्र विखे पाटील, धनश्री विखे पाटील यांचे नाव कार्यकर्त्यांकडून घेतले जाते. देवळालीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र तथा नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचीही चाचपणी सुरू आहे. त्यांनी शनिवारी शिर्डीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर प्रा. राम शिंदे यांच्याकडेही तशी इच्छा व्यक्त केली. पक्षाने आपल्याला आदेश दिला, तर मीही निवडणूक लढवू शकतो, अशी भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. भानुदास बेरड यांनीही व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीतून ऐन वेळी माघार घेणारे संदीप कोतकर यांचेही नाव त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या यादीत जोडले जात आहे.

तनपुरे माझ्या तरी संपर्कात नाहीत: प्रा. शिंदे

अहिल्यानगरच्या जागेबाबत कोअर कमेटीची एक बैठक झाली आहे. आता दुसरी होईल. त्यामुळे मला त्याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही, असे भाजपाचे वरिष्ठ नेते प्रा. राम शिंदे यांनी ‌‘पुढारी‌’शी बोलताना स्पष्ट केले. ‌‘बाहेर‌’चा उमेदवार असेल का? तनपुरे संपर्कात आहेत का? या प्रश्नांवर मात्र त्यांनी ‌‘आमच्या तरी ते संपर्कात नाहीत, आणखी कोणाच्या असतील, तर सांगता येणार नाही,‌’ असे सांगितले. पक्षाकडे अनेक इच्छुक आहेत. सत्यजित कदम हेही त्यात आहेत. त्यांच्यासह काहींनी इच्छा व्यक्त केल्याचेही ते म्हणाले.

तनपुरेंच्या मनात नेमके चाललेय काय?

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहानंतर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री तनपुरेंसाठी अनुकूल असल्याचे बोलले जाते. मात्र, तनपुरेंनी मात्र अद्याप भाजप प्रवेश किंवा विधान परिषदेची उमेदवारी करण्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. कार्यकर्त्यांच्या मते, विधान परिषदेपेक्षा जनतेतून निवडून जायला हवे, पाहिजे तर आणखी दोन वर्षे थांबायची वेळ आली तरी चालेल, असेही सूर कानावर येत आहेत. त्यामुळे तनपुरे नेमका काय निर्णय घेतात, याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

घोडेबाजार अन्‌‍ ‌‘सोधा‌’ पॅटर्न

विधान परिषदेसाठी 461 मतदार आहेत. मोजके मतदार असल्यामुळे निवडणुकीतील संभाव्य ‌‘घोडेबाजार‌’ लपून नाही. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांचा त्याला इतिहास आहे. याशिवाय ‌‘सोधा‌’ पॅटर्नही निर्णायक ठरणारा आहे. त्यामुळे निष्ठावंतांपेक्षा ‌‘सक्षम‌’ आणि ‌‘सोधा‌’ असा उमेदवार देण्यावर सर्वच पक्षांचा भर असणार आहे.

आजपासून रणधुमाळी

विधान परिषदेच्या अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारपासून (दि.25) प्रारंभ होत आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या मतदारसंघासाठी रणधुमाळी सुरू होत असून, कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याची उत्सुकता वाढली आहे.

या मतदारसंघाचे तत्कालीन आमदार अरुणकाका जगताप यांची 1 जानेवारी 2022 रोजी मुदत संपली. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. भारत निवडणूक आयोगाने नुकताच या मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 18 जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीचे नोटिफिकेशन सोमवारी (दि.25) प्रसिद्ध होणार असून, पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. उमेदवारी अर्ज उपलब्ध आणि दाखल करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या मजल्यांवर होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे उमेदवारी अर्ज स्वीकारणार आहेत. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 2 जूनला दाखल अर्जांची छाननी होणार असून, 4 जूनपर्यंत माघारीची मुदत असून याच दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. निवडणुकीच्या या पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण झाली असून, आवश्यक त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अहिल्यानगर महापालिका, पंधरा नगरपालिका-नगरपंचायती तसेच अहमदनगर कॅन्टोन्मेट आदी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य व पदाधिकारी या निवडणुकीत मतदार आहेत. ही मतदारसंख्या 461 असून, प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. त्यावर 26 मेपर्यंत हरकती व दावे मागविण्यात आले आहेत. 30 मे राजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे.

राज्यातील कोणीही भरू शकतो अर्ज

या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तीचे वय 30 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणाही व्यक्तीला या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. मात्र, सदर व्यक्तीचे महाराष्ट्र विधानसभेच्या कोणत्याही एका मतदारसंघातील मतदारयादीत नाव असणे गरजेचे आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 10 हजार रुपये तर अनुसूचित जाती -जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतदारांची संख्या लक्षात घेऊनच नगरच्या जागेचा निर्णय होईल. भाजपचा उमेदवार कोण असेल, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात परिवर्तन घडवून आणणारी ही निवडणूक ठरेल, हा माझा विश्वास आहे.
विनायकराव देशमुख, ज्येष्ठ नेते, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT