नगर: अनेक पंचायत समित्यांमध्ये अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नाहीत, पूर्णवेळ कार्यालयात थांबत नाहीत, त्यामुळे सामान्य जनतेला आपल्या कामांसाठी अनेकदा उंबरठे झिजवण्याची वेळ येते. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर असे ‘लेटलतीफ’ आणि ‘दांडी बहादर’ कर्मचारी प्रशासनाच्या रडारवर आले आहेत.
सीईओंनी पंचायत समित्यांचे सरप्राईज व्हिजीट देण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये कोणत्या विभागप्रमुखाला कधी व कोणती पंचायत समिती तपासणीसाठी दिली जाणार, याविषयीही कमालीची गोपनियता पाळली जात आहे. दरम्यान, या तपासणीत कर्तव्यात कसूरपणा आढळणार्या कर्मचार्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही सूत्रांकडून समजले. (Latest Ahilyanagar News)
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय यंत्रणा ग्रामीण विकासाची केंद्रबिंदू समजली जाते. त्यामुळे ही यंत्रणा चांगली चालली पाहिजे, जनतेची कामे वेळेवर झाली पाहिजेत, त्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांनीही कार्यालयात हजर राहिले पाहिजे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी कठोर पाऊले उचलल्याचे समजते. या संदर्भात नागरिकांच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे सीईओंनी सर्व विभागप्रमुखांना पंचायत समितींना सरप्राईज व्हिजीट देण्याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र ती व्हिजीट कधी द्यायची, कोणी कुठे द्यायची, याबाबत गोपनीयता पाळली जात आहे.
कार्यालयीन वेळेपूर्वीच पथक पोहचणार!
सकाळी 9.45 ही कार्यालयाची वेळ आहे. मात्र अनेक अधिकारी व कर्मचारी हे वेळेवर येत नाहीत. त्यामुळे तपासणीचे पथक हे पंचायत समित्यांवर सकाळी 9.30 वाजता हजर राहणार आहे. त्यासाठी त्यांना सकाळी 7 वाजता मोबाईलवर संबंधित पंचायत समितीचे सीईओ स्वतः नाव कळविणार असल्याचेही सूत्रांकडून समजले.
पारनेरमध्ये अधिकारी पोहचले, कर्मचारी गायबच!
सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी सोमवारी सकाळी 9.30 वाजता अचानक पारनेर पंचायत समितीमध्ये भेट दिली. यावेळी काही कर्मचार्यांसोबतच अधिकारीही हजर नसल्याचे दिसले. त्यामुळे त्या कर्मचार्यांना गटविकास अधिकार्यांमार्फत नोटिसा बजावल्या जाणार आहेत तर अधिकार्यांना जिल्हा परिषदेतून शो कॉज काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत गुंजाळ यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
साहेब, एकदा ग्रामपंचायतींनाही भेटी द्या!
सीईओंच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. मात्र पंचायत समितीसोबत ग्रामपंचायतींमध्येही एकदा अचानक तपासणी करावी. दररोज ग्रामसेवक येत नाहीत, आले तर तालुक्याला मिटींग असल्याचे सांगून दुपारी 1 नंतर ग्रामपंचायतीला टाळे लावतात. काही ठिकाणी कलार्कच ग्रामपंचायत चालवतात, त्यामुळे ही मोहीम अगोदर ग्रामपंचायतीपासूनच सुरुवात करावी, अशीही मागणी जनतेतून होताना दिसत आहे.