कर्जत: करमाळा, श्रीगोंदा, पारनेर व कर्जत तालुक्याच्या हक्काच्या २१ टीएमसी पाण्यासाठी आता शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र होऊ लागला आहे. डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या कामावरील स्थगिती तातडीने उठवून प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करावे आणि कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी डिंभे-माणिकडोह बोगदा कृती समितीतर्फे कर्जत तालुक्यात गावोगावी जनजागृती बैठका घेतल्या जात आहेत.
याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २८) थेरवडी येथे झालेल्या शेतकरी बैठकीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हक्काचे पाणी मिळविल्याशिवाय आता माघार नाही, असा निर्धार करीत थेरवडीतील शेतकऱ्यांनी एकजुटीची वज्रमूठ आवळली. या वेळी ॲड. कैलास शेवाळे, शांतिलाल कोपनर, अशोक जायभाय, दादासाहेब सोनमाळी, सुनील शेलार, देविदास आबा गोडसे, डॉ. चंद्रकांत थोरात, मोहनराव गोडसे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
डिंभे धरण ते माणिकडोह बोगद्याचे काम मार्गी लागल्यास कुकडी लाभक्षेत्रातील दुष्काळी भागाला पाण्याचा मोठा आधार मिळू शकतो. मात्र, या बोगद्याच्या कामाला विरोध झाल्याने कामावर स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. ही स्थगिती उठवून बोगद्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी आग्रही मागणी बैठकीत करण्यात आली. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवरही या प्रश्नाचा फेरविचार करण्याची मागणी उपस्थितांनी केली.
बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या भावना आक्रमकपणे व्यक्त केल्या. पाण्याअभावी शेतीचे होणारे नुकसान, वारंवार भेडसावणारा दुष्काळ आणि सिंचनाच्या पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष यामुळे शेतकऱ्यांचे जीवनचक्र अडचणीत आले आहे. त्यामुळे हा लढा कोणत्याही एका गावापुरता किंवा व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच हा संघर्ष कोणत्याही एका विशिष्ट पक्षाचा नसून सर्वपक्षीय सर्व जनतेचा आणि सर्व नागरिकांचा असल्याची भावना समितीतर्फे व्यक्त करण्यात आले.
‘एकीची ताकद दाखवू, हक्काचे पाणी मिळवू!’
गावागावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या आंदोलनाला ताकद देण्याची गरज या वेळी अधोरेखित करण्यात आली. केवळ चर्चा आणि आश्वासनांवर समाधान न मानता बोगद्याचे काम प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत आणि हक्काच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत संघर्ष सुरू ठेवायचा, असा निर्धार करण्यात आला. आंदोलनाला थेरवडी गावाचा पाठिंबा असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. प्रास्ताविक बाळासाहेब थोरात यांनी केले. ॲड. कैलास शेवाळे, शांतीलाल कोपनर, दादासाहेब सोनमाळी, अशोक जायभाय, सुनील शेलार सोपानराव थोरात सुनील महाराज पोकळे व अजिनाथ जायभाय यांनी मनोगत व्यक्त केले.
गावोगावी बैठकांचा धडाका!
डिंभे-माणिकडोह बोगदा कृती समितीने तालुक्यातील गावागावांत बैठका घेऊन शेतकऱ्यांना एकत्र आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. थेरवडीतील बैठकीला मिळालेला मोठा प्रतिसाद हा या आंदोलनाला ग्रामीण भागातून मिळणाऱ्या पाठिंब्याचे द्योतक मानले जात आहे. आगामी काळात या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढविण्याचा निर्धार कृती समिती आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.