नगर : कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करुन उत्पादकता वाढविणे, हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासनाने यंदा ‘कृषी समृध्दी योजना’ सुरु केली. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नावीण्यपूर्ण बाबी राबविण्यासाठी शासनाने 22 कोटी 29 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने 22 जुलै 2025 रोजी कृषी समृध्दी योजना सुरु केली आहे. या योजनेतून 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्हास्तरावर शेडनेट हाऊसमध्ये माती विरहित ब्लुबेरी व हळद लागवड, अनुसूचित जमतीच्या शेतकऱ्यांना शेडनेट हाऊसमध्ये स्ट्रॉबेरी लागवड, शेतकरी उत्पादक कंपनीसाठी पाचशे मेट्रिक टन शीतगृह तसेच भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रिया युनिट उभारणी, वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी ऑटोमॅटिक फर्टिगेशन व इरिगेशन शेड्युल्डिंग युनिट उभारणी, बहुभूधारक शेतकऱ्यांना निर्यातक्षम केळी लागवडीस प्रोत्साहन देणे, वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी जीवामृत स्लरी प्रकल्प तसेच संत्रा उत्पादक शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ग्रेडिंग,वॅक्सिंग,पॅकींग युनिटची उभारणी आदी शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध नावीण्यपूर्ण बाबी राबविण्यात येणार आहेत.
या नावीन्यपूर्ण बाबी राबविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 60 टक्के तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान उपलब्ध केले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट लाभासाठी पात्र असणार आहेत. यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर सोडतीव्दारे लाभार्थ्यांची निवड केली जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी प्रणालीवर सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करुन सहभागी व्हावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.
कांदा चाळ उभारणीसाठी : 2.52 कोटी, निर्यातक्षम केळी लागवड : 1.93 कोटी,एकात्मिक पॅक हाऊस उभारणी : 3.84 कोटी, शीतगृह उभारणी : 2.88 कोटी, जीवामृत स्लरी प्रकल्प : 3.60 कोटी, भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रिया युनिट : 2.55 कोटी, संत्रा ग्रेडिंग व पॅकिंग युनिट : 1.38 कोटी, ब्लुबेरी लागवड : 89.13 लाख, हळद लागवड : 89.52 लाख, मध उत्पादन व प्रक्रिया केंद्र उभारणी : 18.76 लाख रुपये.