कोळपेवाडी: कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील नागरीकांकडून आकारण्यात येणारी वाढीव घरपट्टी (मालमत्ता कर) रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.आ. काळे यांनी गुरुवारी (दि.१५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून लेखी निवेदन दिले.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालमत्ताचे चुकीचे वर्गीकरण, कर निर्धारणातील त्रुटी, आकारणीतील विसंगती तसेच नागरिकांना पुरेशी माहिती न देता करण्यात आलेली करवाढच्या अनेक हरकती व तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे ठप्प झालेली बाजारपेठ, वाढलेली महागाई, आवाक्याबाहेर चाललेला जीवनावश्यक खर्च अशा आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या कोपरगावच्या नागरिकांवर वाढीव घरपट्टी लादल्यास त्यांच्या आर्थिक अडचणी अधिकच वाढणार आहेत.
असंख्य नागरिकांनी करवाढी विरोधात नोंदविलेल्या हरकती, तक्रारी व जनतेमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला रोष पाहता हि करवाढ कोपरगावचे नागरीक सोसुच शकत नाही. त्यामुळे सदर वाढीव करवाढीचा पुनर्विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे एकूण परिस्थितीचा विचार करून वाढविण्यात आलेली वाढीव घरपट्टी पूर्णपणे रद्द करून पूर्वीच्या कर आकारणी पद्धतीनुसारच मालमत्ता कर आकारण्याबाबत संबंधित विभागास सूचना द्याव्यात, अशी मागणी आ. काळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले, अशी माहिती आ. काळे यांनी दिली आहे.