कोपरगाव: कोपरगाव तालुक्यात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. बाजारभाव कोसळल्यामुळे ‘लाल सोने’ म्हणून ओळखला जाणारा कांदा आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून उत्पादन खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मते, एक एकर कांदा पिकवण्यासाठी सुमारे 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो. यात बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचा समावेश आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच कांदा उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागला. अवकाळी पावसामुळे सुरुवातीला पेरणीचे नुकसान झाले आणि पुन्हा पेरणी करावी लागली. त्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली. येथील शेतकरी म्हणतात की, “पेरणीच्या वेळी पावसामुळे बियाणे वाया गेले. पुन्हा खर्च करून पेरणी केली. आता पिक तयार झाले तरी दर घसरल्याने मेहनतीचे चीज होत नाही.”
सध्याचे दर उत्पादन खर्चही भरून काढत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यंदा उत्पादनातही घट झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. परिणामी, अनेक शेतकरी बाजारात कांदा विक्री करण्याऐवजी शेतात किंवा गोदामात साठवणूक करत असून भविष्यात दर वाढतील, अशी आशा व्यक्त करत आहेत.
दरम्यान, वाढत्या तोट्यामुळे कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादक आता शासनाकडून तातडीने हस्तक्षेप आणि हमीभावाची मागणी करत आहेत. अन्यथा या हंगामातील तोटा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका देणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
कांद्याचे गणित कोलमडले
सध्या बाजारात कांद्याला केवळ 1,000 ते 1,100 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळत आहे. त्यातच काढणीसाठी लागणारी मजुरीच सुमारे 12 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने अनेक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.