सोनई : ग्रामसेवक आत्महत्येप्रकरणी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) आणि विस्तार अधिकार्यांविरोधात सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गटविकास अधिकारी संदीप दळवी व विस्तार अधिकारी बबन वाघमोडे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा अधिकार्यांची नावे आहेत. मानसिक व आर्थिक छळ करून ग्रामसेवक बाचकर त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद बाचकर यांच्या पत्नी प्रमीला यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दोघांविरोधात बीएनएस 108, 3(5) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (Latest Ahilyanagar News)
करजगाव (ता.नेवासा येथील) रहिवासी बाजीराव बाचकर हे अंजनापूर (ता.कोपरगाव) येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. 8 ऑगस्ट रोजी गावी करजगाव येथे विषारी औषध सेवन करून त्यांनी आत्महत्या केली होती. प्रमिला बाजीराव बाचकर यांनी पोलिसात फिर्याद दिली.
कोपरगाव पंचायत समितीतील गटविकास अधिकारी संदीप दळवी व विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांनी पती बाचकर यांचा मानसिक व आर्थिक छळ करून त्यांना त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून बाचकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान रविवारी (दि.17) पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकार्याच्या चालकाने आत्महत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळ्या चर्चा असल्या, तरी वरिष्ठांच्या जाचातून संबंधित कर्मचार्याला मानसिक त्रास सुरू होता का, त्याने यापुर्वी काही तक्रार अर्ज दिले होते का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.