कोल्हार: फटाक्यामुळे लागलेल्या आगीत येथील कैलास पांडुरंग कोळपकर यांच्या मालकीच्या भांड्याच्या गोदामाला काल सोमवारी (दि.९) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत गोदामातील लाखो रुपयांची भांडी आणि इतर शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाच्या दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि.९) सायंकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास कैलास पांडुरंग कोळपकर यांच्या मालकीच्या भांडी गोदामाला फटाक्यामुळे अचानक आग लागली. या गोदामामध्ये भांड्यांसोबतच ताडपत्री, शेडनेट आणि मुरघास बॅगा, अशा विविध साहित्याचा मोठ्या प्रमाणावर साठा होता.
या ज्वलनशील साहित्यामुळे आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.आगीने भीषण रूप घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच प्रवरा सहकारी साखर कारखाना आणि राहाता नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
जवानांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, आग वेगाने पसरल्यामुळे कैलास कोळपकर यांच्या मालकीचे लाखो रुपयांचे साहित्य जळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.