राहुरी : राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील 23 गावांना के.के. रेंज संरक्षण क्षेत्राचे ग्रहण लागले आहे. सैन्य दलाकडून संरक्षित क्षेत्राची माहिती व मुल्यांकन प्राप्त करण्याबाबत महसूल प्रशासनाकडे अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिग्रहण सूचना प्रकाशित होताच सैन्य दलाच्या हालचाली वाढल्याचे बोलले जाते. सैन्य दलाचे हेलिकॉप्टर संबंधित क्षेत्रात अनेकदा घिरट्या घालत असल्याने ग्रामस्थांमध्ये धडकी भरली आहे.(Latest Ahilyanagar News)
राहुरी तालुक्यातील 12 गावे, पारनेर तालुक्यातील 5 तर नगर तालुक्यातील 6 अशा 23 गावांमध्ये के.के. रेंज क्षेत्राचे संरक्षित क्षेत्र म्हणून सैन्य दलाकडे नोंद आहे. संबंधित क्षेत्रावर के.के. रेंज येणार असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरूच आहे. परिणामी संबंधित भागातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयातून पुन्हा अधिग्रहण सूची प्रकाशित झाली. के के रेंज सैन्य दल अधिकाऱ्यांच्या नोंदणीनुसार राहुरी तालुक्यातील बाभूळगाव, ताहाराबाद, घोरपडवाडी, जांभूळबन, गाडकवाडी, कुरणवाडी, दरडगावथडी, वरवंडी, बारागाव नांदूर, चिंचाळे, गडधे आखाडा या 12 गावांमध्ये 13 हजार 518.78 हेक्टर क्षेत्र संरक्षण क्षेत्रात अधोरेखित करण्यात आल्यात आहे
एकूण तिन्ही तालुक्यातून 28 हजार 818.28 हेक्टर क्षेत्रावर के.के. रेंज-2 चे सुरक्षित क्षेत्र ग्रहित धरण्यात आले आहे. तिन्ही तालुक्यातील संरक्षित क्षेत्र बाबत शासनाकडून दरवर्षी अधिसूचना जाहिर केली जाते. त्यानुसार नुकतेच जिल्हाधिकारी यांनी पुन्हा संबंधित 23 गावे के के रेंजच्या सैन्य दलाचे युद्ध सराव अधिग्रहण क्षेत्र म्हणून जाहीर केले. परिसरातील ग्रामस्थ यांना उपयुक्त सूचना देत सराव काळात नुकसान तसेच सतर्कतेची सूचना देण्यात आली.
मुळा धरण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ निर्मितीसाठी पूर्वीच आपल्या कसदार जमिनी देत शेकडो शेतकरी विस्थापित झाले. धरण, विद्यापीठ निर्मिती नंतर पुन्हा शेतकरी व ग्रामस्थानी कसे बसे आपले बस्तान निर्माण केले. परंतु के.के. रेंजचे अधिग्रहण होणार असल्याच्या धास्तीने शेतकरी भयभित झाले आहे. संबंधित परिसरातील आर्थिक व्यवहार अडचणीचे ठरू लागले आहे. के.के. रेंज अंतर्गत 23 गावातील जमिनीचे अधिग्रहण होणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
राजकीय नेत्यांकडून अधिग्रहण होऊ देणार नसल्याचे आश्वासन मिळत आहे. परंतु याबाबत केंद्र शासनाकडे उचित पाठपुरावा करून अधिग्रहण होऊ नये म्हणून नियोजन हाती घेणे गरजेचे बनले आहे. यापुर्वी माजी दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी, माजी खासदार डॉ. सुजय विखे व कार्यरत खासदार नीलेश लंके यांनी वेळोवेळी केंद्रीय संरक्षण अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केलेला आहे. परंतु आश्वासनाखेरीज काही हाती लागत नसल्याने 23 गावातील ग्रामस्थ हताश झाले आहे.
पालकमंत्री विखे पाटलांची मदत घेऊ : धनराज गाडे
के के रेंज कृती समिती तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या माध्यमातून तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या समवेत बैठक घेतली होती. त्यावेळी देशाचे सैन्य दल प्रमुख स्व.बिपीन रावत यांनी अधिग्रहण होणार नसल्याचे जाहीर केले होते. परंतु पुन्हा के के रेंज भूत जागे झाले असून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे व आमदार शिवाजी कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटून के.के रेंजचा प्रश्न कायमस्वरूपी संपवू असे आश्वासन गाडे यांनी दिले.
शासनाने भूमिका जाहीर करावी : गाडे
के.के. रेंज-2 अंतर्गत तीन्ही तालुक्यातील 23 गावाचे क्षेत्र अधिग्रहीत होणार असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. एकीकडे क्षेत्र जाणार नसल्याचे स्पष्टीकरण राजकीय नेत्यांकडून मिळते. तर दुसरीकडे सैन्य दलाचे अधिकारी विविध माहिती मागवत अधिसूचना जाहिर करतात. यामुळे के.के.रेंजचा मुद्दा संबंधित गावांसाठी तापदायक ठरत आहे. राजकीय नेते, सैन्य दलाचे अधिकारी व शासकीय प्रशासनाने एकत्र बसून स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी बारागाव नांदुर गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रभाकर गाडे यांनी केली आहे.