नगर: मराठी भाषा ही मराठी माणसाची अस्मिता आहे. शिवसेना सत्तेत असताना आम्ही प्रत्येक शाळेमध्ये मराठी सक्तीची केली होती. परंतु गुजरातच्या शेठजींच्या दावणीला बांधलेल्या राज्यातील महायुती सरकारने हिंदी ही तृतीय भाषा म्हणून इयत्ता 1ली ते 5वी साठी सक्तीची केली आहे. हा महाराष्ट्र द्रोह आहे. मराठी माणसाच्या स्वाभीमानावर सरकारने केलेला हा हल्ला शिवसेना अजिबात खपवून घेणार नाही, असा घाणाघात ठाकरे शिवसेना शहर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे.
दिल्लीगेट येथे शहर ठाकरे शिवसेनेच्या वतीने हिंदीच्या सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी महायुतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आंदोलनात काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी झाली. यावेळी काळे बोलत होते. (Latest Ahilyanagar News)
शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा म्हणाले, महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सत्ताधार्यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत कराळे म्हणाले, आधी मराठी माणसाच्या हाताचा रोजगार यांनी पळवला. आता हिंदीचे आक्रमण हे महाराष्ट्र द्रोही करू पाहत आहेत. मराठी माणूस हा डाव मात्र यशस्वी होऊ देणार नाही.
शहर सेनेचा असा असेल त्रिसूत्री कार्यक्रम
शहर ठाकरे शिवसेनेच्या वतीने किरण काळे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात शासन निर्णयाची होळी करून आंदोलन छेडण्यात आले आहे. दुसर्या टप्प्यात नागरिकांच्या स्वाक्षरीने निर्णयाला विरोध करणारे 5000 पत्र राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहेत.
तिसर्या टप्प्यात शहरातील कवी, साहित्यिक यांच्या भेटी घेत या राज्यव्यापी जन आंदोलनात सहभागी होण्याच्या आवाहन केले जाणार आहे. दरम्यान, शेतकरी विरोधी वक्तव्य करणार्या मंत्री बबनराव लोणीकर यांची प्रतिमा शिवसैनिकांनी पायदळी तुडविल्या.