Jayakwadi Dam water protest Pudhari
अहिल्यानगर

Jayakwadi Dam water protest: पाण्यासाठी ४६ गावांचा एल्गार; बैलगाड्यांसह गावकऱ्यांचा खरवंडीत महामार्गावर चक्काजाम

प्रशासनाच्या आश्वासनानंतर प्रा. कीर्तने यांचे उपोषण मागे

पुढारी वृत्तसेवा

खरवंडी/पाथर्डी: भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या ४६ गावांना जायकवाडी धरणातून पिण्यासह शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

गाव बंद ठेवून करण्यात आलेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

बैलगाड्या आणि पिण्याच्या पाण्याच्या टाक्या रस्त्यावर आणून शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेत प्रा. प्रल्हाद कीर्तने यांनी पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले.

भगवानगड परिसरातील गावांना जायकवाडी प्रकल्पाचे पाणी मिळावे, यासाठी प्रा. प्रल्हाद कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली खरवंडी कासार येथे बेमुदत उपोषण सुरू होते. या मागणीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, यासाठी गुरुवारी खरवंडी कासार गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सकाळपासूनच परिसरातील ४६ गावांमधील शेतकरी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. सुमारे अडीच तासाहून अधिक काळ रस्ता रोको अडवून ठेवला होता.

आंदोलनाची तीव्रता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी बैलगाड्या आणि पिण्याच्या पाण्याच्या टाक्या महामार्गावर आणून ठेवल्या होत्या. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

ॲड. प्रताप ढाकणे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, संजय बडे, अंकुश कासोळे, माणिक खेडकर, नितीन कीर्तने, संजय कीर्तने, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, सुभाष केकाण, प्रदीप पाटील, पिराजी कीर्तने, किरण खेडकर, वामन कीर्तने, बाळासाहेब गोल्हार, आबा खेडकर, विकास वाघ, दत्तू पठाडे, श्रीराम फुंदे, महारुद्र कीर्तने, बाबासाहेब वाघ, लहू दराडे, अशोक गोल्हार, महादेव दराडे, वसंत खेडकर, पांडुरंग खेडकर आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनस्थळी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, गटविकास अधिकारी राजेंद्र धस, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक नितीन कंडारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे तसेच जीवन प्राधिकरण आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी ॲड. प्रताप ढाकणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणीप्रश्नावर थेट सवाल उपस्थित केले. केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न त्यांनी केला. सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना टँकर नियमित सुरू राहणार का, टँकरद्वारे पुरेसे पाणी मिळणार का, याचेही स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. ४६ गावांच्या पाणीप्रश्नावर ठोस कालबद्ध कार्यवाही झाली पाहिजे. शेतकऱ्यांना वारंवार आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत प्रस्थापित व्यवस्थेवर टीका केली. ते म्हणाले, भगवानगडाच्या परिसरातील गावांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रस्थापितांनी या भागाला कायम वंचित ठेवले असून, येथील जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. पाण्याचा प्रश्न हा केवळ एका गावाचा नसून ४६ गावांतील शेतकरी आणि नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न आहे. आगामी काळात या पाणीप्रश्नावर आवाज उठविण्यासाठी मीदेखील तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आंदोलनाची तीव्रता आणि उपोषणकर्त्यांची खालावणारी प्रकृती लक्षात घेऊन प्रशासनाने पाणीप्रश्नावर सकारात्मक आश्वासन दिले. त्यानंतर ॲड. प्रताप ढाकणे आणि प्रा. लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत प्रा. प्रल्हाद कीर्तने यांना पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.

मात्र, दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्तता न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. भगवानगड परिसरातील गावांच्या हक्काच्या पाण्यासाठी हा लढा सुरूच राहणार असल्याची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT