खरवंडी कासार: येथे आठवडे बाजार भरण्यासाठी बाजार ओटे बांधलेले असूनही ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे व नियोजनाच्या अभावामुळे आठवडे बाजार रस्त्यावर भरत आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत.
खरवंडी कासार येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा बायपास झाल्याने जड वाहतूकही गावाबाहेरून जात असली, तरीही खासगी प्रवासी वाहतूक ही गावामधून जाणाऱ्या रस्त्यावरूनच जास्त असते. त्यात रस्त्यावर बाजार भरल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे. या ठिकाणी शेतकरी स्वतः भाजीपाला विकण्यासाठी महामार्गावर बसतात, तर रस्त्याकडेला स्टेशनरी, फळविक्रेते, मिठाईवाले बसतात.
त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. रस्ता नावालाच राहत असून, साधी दुचाकीही रस्त्यावरून जात नाही. त्यामुळे कायम वाद राहतात खरवंडी कासार येथील ग्रामपंचायतनेजिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून बाजार ओटे बांधलेे आहेत. परंतु आता या ओट्यावर बाजार भरत नसल्याने काही ओटे घाणीच्या साम्राज्याचे शिकार बनले आहेत, तर काही बाजार ओटे अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत.
गावामध्ये भरणाऱ्या बाजाराच्या कर वसुलीसाठी
ग्रामपंचायतने वार्षिक लिलाव करून कर वसूल केला आहे. त्यामुळे बाजारकरूंना कसलीही सुविधा नसताना कर पावती भरावी लागते. मात्र, सुविधा काहीच मिळत नाही. ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे खरवंडी कासारचा आठवडे बाजार हा बाजार ओटे सोडून पूर्ण रस्त्यावर भरण्यास सुरुवात झाली.
त्यामुळे वाहनधारक चालक व ग्रामस्थांचे हाल होतात. त्याच प्रमाणे रस्त्यावर असणाऱ्या स्थानिक दुकानदारांच्या दुकानासमोर भाजी विक्रेते बसत असल्याने दुकानात जाण्यासाठीही रस्ता राहत नाही. अनेकदा या प्रकारामुळे ग्राहक व भाजीविक्रेते यांच्यात वादाचे प्रसंगी उद्भवले आहेत. त्यामुळे रस्त्यावर भरणारा बाजार ग्रामपंचायतीने बांधलेल्या ओट्यांवर भरवावा, अशी मागणी होत आहे.