जामखेड: तालुक्यातील खर्डा येथील फुटलेल्या मोहरी तलावाची धरण सुरक्षा आढावा समितीने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या तलावावर खर्डासह परिसरातील अनेक गावं पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी अवलंबून आहेत. अतिवृष्टीमुळे धरणाच्या सांडव्यालगतचा भराव खचल्याने मोठे भगदाड पडले होते. परिणामी तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेले असून, याचा परिणाम स्थानिक जलसाठ्यावर आणि शेतीवर होत आहे.
या परिस्थितीची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून दुरुस्तीच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर धरण सुरक्षा आढावा समितीने घटनास्थळी भेट देत नुकसानीचे बारकाईने परीक्षण केले. यावेळी मुख्य अभियंता संजय चोपडे, कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे तसेच निवृत्त अधीक्षक अभियंता शिवाजी बोलभट यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. या निवेदनात मोहरी तलावाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, कार्याध्यक्ष रामहरी गोपाळघरे, मोहरीचे उपसरपंच हनुमंत बारगजे, श्रीकांत लोखंडे, कृष्णा गोपाळघरे, सुहास गोलेकर, किसन सानप, स्वप्निल अंकुश, विकास खरात, जालिंदर सोनटक्के उपस्थित होते.
समितीने परिस्थितीची गांभीर्याने नोंद घेतली असून, दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे. या कामाची निविदा काढून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होऊन जलसाठा सुरक्षित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना होतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.