Karjat Farmers Protest Pudhari
अहिल्यानगर

Karjat Farmers Protest: दिवसाआड वीजपुरवठ्याविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; करपडी फाट्यावर दीड तास वाहतूक रोखली

मार्चपर्यंत दररोज आठ तास वीज देण्याची मागणी; नदीकाठच्या कांदा, केळी, पेरू उत्पादक शेतकऱ्यांचा आंदोलनात सहभाग

पुढारी वृत्तसेवा

खेड: शेतीचा वीजपुरवठा दिवसाआड केल्याने कर्जत तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शनिवारी (दि. २८) करपडी फाट्यावर दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. शिवसेनेचे नेते बिभीषण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिंपोरा, बाभूळगाव दुमाला, मानेवाडी, करपडी, खैदानवाडी, आखोणी, खेड व अन्य गावातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतीचा वीजपुरवठा दिवसाआड केवळ सहा तास करण्यात आला आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांची कांदा, केळी, पेरू आणि अन्य पिके शेतात उभी असून, त्यांची काढणी मार्चपर्यंत होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत दररोज आठ तास वीजपुरवठा पूर्ववत सुरू ठेवावा, अशी मागणी करण्यात आली. पिके उभी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. ऐन हंगामात वीज कपात केल्यास पिकांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडतील.

वीजपुरवठा बंद करण्यापूर्वी किमान एक महिना अगोदर सूचना दिली असती, तर शेतकऱ्यांना पिकांची लागवड टाळून खर्च वाचवता आला असता, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. शेतीला वीज देणे शक्य नसेल तर उभ्या पिकांची पाहणी करून सरकारने नुकसानभरपाई द्यावी. एकीकडे दुष्काळाचे कारण देत शेतीची वीज बंद करायची आणि दुसरीकडे उजनीतून सोलापूर जिल्ह्याला बेसुमार पाणी सोडायचे, हे धोरण चुकीचे असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. धरणासाठी आमच्या जमिनी पाण्याखाली गेल्या, तरी आम्हालाच पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. शेती आणि पाण्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी एकत्र यावे, असे आवाहनही करण्यात आले.

शासनाच्या निर्णयाविरोधात ग्रामसभांचे ठराव पाठविण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. तसेच यावेळी बाभूळगाव-शिंपोरा रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. तहसीलदार रवी सातवन आंदोलनस्थळी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अखेर सातवन यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत शेतकऱ्यांच्या भावना शासनदरबारी मांडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी महावितरणचे सहायक अभियंता संदीप पाटील, मंडलाधिकारी बाबू होगले, पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या उपअभियंता संजीवनी जगताप उपस्थित होते.

आंदोलनात सुनील काळे, माऊली सायकर, युवराज हाके, निवृत्ती कानगुडे, धनंजय मोरे, जालिंदर काळे, नितीन पाटील, आजिनाथ शेटे ,कैलास शिंदे, दिपक शेटे, अजित कानगुडे, तुषार गायकवाड, रोहन काळे, तानाजी काळे, बाळासाहेब माने, सत्यवान काळे, अमोल गायकवाड, गोरख कावळे, येताळा शेजाळ, नंदू माळवदकर, रामभाऊ माळवदकर आदींसह शेतकरी सहभागी झाले. पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब मुळीक, सहायक पोलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन पोकळे व अमोल रायकर यांनी बंदोबस्त ठेवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT