कर्जत: दिवाळीच्या सुट्टीनंतर ग्रामीण भागातील नागरिक आता परत कामावर, शाळा-कॉलेजांकडे माघारी जात आहेत. मात्र, अहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत एसटी बसस्थानकावर रविवारी सकाळपासूनच प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. सुटीनंतर सुरू झालेल्या या प्रवासात बसची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांचे हाल होत असून, नागरिकांना खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागण्याची वेळ आली आहे. (Latest Ahilyanagar News)
प्रवाशांवर ताटकळण्याची वेळ
कर्जत बसस्थानकावर सकाळपासूनच प्रवाशांची मोठी रांग लागलेली दिसली. अनेक गावे, तालुके आणि शेजारच्या जिल्ह्यांकडे जाणाऱ्या बस फक्त मर्यादित संख्येत धावत असल्याने लोकांना दीर्घकाळ थांबावे लागले. स्थानकावर लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध प्रवासी बसची वाट पाहत ताटकळत उभे असल्याचे दृश्य दिसत होते. काहींनी तर तासाभरापेक्षा जास्त वेळ थांबून बस न मिळाल्याने खासगी जीप, ऑटो वा कारने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
खिडकीमधून एसटीमध्ये प्रवेश
एसटी उशिरा येत असल्यामुळे आणि संख्या कमी असल्यामुळे मोठी गर्दी प्रत्येक एसटीला होत आहे. एसटीमध्ये आपल्याला जागा मिळणार नाही हे पाहून काही जणांनी एसटीच्या प्रवेशद्वारामधून प्रवेश करण्याऐवजी खिडकीमधून प्रवेश करून जागा मिळवण्याचा प्यत्न केल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
एसटी आगार प्रश्न अद्याप प्रलंबित
कर्जत येथे स्वतंत्र एसटी आगार उभारणीचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. एसटी आगार मंजूर आहे कर्जत एसटी आगारासाठी एसटी बसदेखील आल्या होत्या; मात्र त्या परत गेल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीलाही स्थगिती मिळाल्याचे समजते. या कारणामुळे स्थानिक पातळीवर पुरेशी बसेस उपलब्ध होत नाहीत.राज्यातील अन्य भागांत सुट्टीनंतर अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या असल्या, तरी कर्जत परिसरात मात्र त्या प्रमाणात नियोजन झालं नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. आगार प्रश्न सोडवला नसल्यामुळे स्थानिकांना या समस्येचा फटका दर वर्षी बसतो.
बससेवेचे नियोजन वाढवा
प्रत्येक सणानंतर प्रवासासाठी अशीच गर्दी होते. बसेस कमी असल्याने त्रास सहन करावा लागतो. सरकारने कर्जत येथे एसटी आगार उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशी मागणी स्थानिक प्रवाशांनी केली आहे. कर्जत-श्रीगोंदा, कर्जत-अहिल्या नगर, कर्जत-पुणे, तसेच ग्रामीण भागातील मार्गांवर अतिरिक्त बससेवा उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा
या प्रकरणावरून स्थानिक जनतेत नाराजीचा सूर उमटला असून, राज्य परिवहन विभागाने कर्जतसाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी पुढे येत आहे. स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधींनी या विषयावर आवाज उठवून कर्जत एसटी आगाराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे