Karjat City Naming Pudhari
अहिल्यानगर

Karjat City Naming: कर्जत शहराचे नामकरण संत सद्गुरू गोदड महाराजनगर करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचा आंदोलन

आंदोलनाच्या दखल घेत भाजप युवक नेते सचिन घुले पाटील यांनी आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: कर्जत शहराचे नामकरण संत सद्गुरू गोदड महाराजनगर करा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. 2) वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने कर्जत नगरपंचायत कार्यालयासमोर प्रदेश प्रवक्ता नगरसेवक अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष अनिल समुद्र, शेतमजूर वृद्ध भूमी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण, अमोल क्षीरसागर, चांगदेव सरोदे, तुकाराम पवार, लखन पारसे, पार्वती भोसले, रंगिशा काळे, रवींद्र काळे, शीतल काळे, श्री. धावडे, सोनू भिसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या आंदोलनाची दखल घेत भाजपचे युवा नेते सचिन घुले पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत उपस्थित नगरसेवक व आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी सचिन घुले म्हणाले, आराध्य दैवत संत सद्गुरू गोदड महाराज यांचे नाव कर्जत शहराला देण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निश्चितच पुढाकार घेण्यात येईल. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने ही मागणी केल्याबद्दल मनस्वी आनंद वाटतो. महाराजांचे नाव देण्याचा निर्णय अत्यंत योग्य असून, आम्हाला महाराजांविषयी नितांत श्रद्धा आहे. यासाठी सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक ठराव व कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी अरुण जाधव म्हणाले, वंचित बहुजन आघाडी पक्ष सातत्याने दलित, शोषित, पीडित जनतेसाठी काम करीत आहे. कर्जत ही संतांची भूमी असून, थोर संत सद्गुरू गोदड महाराज यांचे नाव कर्जत शहराला देणे ही आमची प्रमुख मागणी आहे. निवेदन आंदोलनाचे आल्याबरोबर अधिकारी वेळेत दखल घेत नसल्यामुळे आंदोलने करावी लागतात. आमचे आंदोलन सुरू होताच सचिन घुले पाटील आंदोलन स्थळी आले. त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांशी व नगरसेवकांशी चर्चा केली. आमच्या मागण्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. अशा पद्धतीचे नेतृत्व समाजासाठी अत्यंत गरजेचे आहे . यामुळे प्रश्न सुटण्यासाठी मदत होते. मात्र, वंचित बहुजन आघाडी जेव्हा आंदोलन करते, तेव्हा प्रश्न सुटल्याशिवाय माघार घेत नाही. यावेळी आंदोलकांच्या वतीने सोमनाथ भैलुमे, अनिल समुद्र, तुकाराम पवार, अमोल क्षीरसागर, चांगदेव सरोदे यांची भाषणे झाली.

पाणीपुरवठा विभागाचे सभापती उपगटनेते

सतीश पाटील यांनी नगरपंचायतीच्या वतीने आंदोलकांशी चर्चा करून सर्व मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच कर्जत शहरातील अनेक वर्षांपासून राजीव गांधी नगर, अक्काबाई नगर यासह इतर परिसरातील नागरिकांच्या घरांचा प्रलंबित असणारा प्रश्न विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, प्रवीण घुले पाटील, सचिन घुले, नगराध्यक्ष रोहिणी घुले, उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे व सर्व नगरसेवक यांच्या पुढाकारातून सोडविला आहे. यावेळी नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, रवींद्र सुपेकर तसेच नगरपंचायतचे अधिकारी उपस्थित होते.

कर्जत येथील ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी सर्वांना नितांत श्रद्धा आहे. त्यांचे नाव शहराला देण्याबाबत आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घेऊ.
सचिन घुले पाटील, युवक नेते, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT