कर्जत: तालुक्यातील वीजप्रश्न गंभीर बनत असून, खंडित वीजपुरवठ्यामुळे चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रश्नी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तालुका भाजपतर्फे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे बुधवारी (दि. 25) निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी तालुकाध्यक्ष अनिल गदादे, अशोक खेडकर, राजेंद्र भोसले, राहुल गांगर्डे, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, विनोद शिंदे, ॲड. राहुल जामदार आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या संध्याकाळी सात ते दहा रोज बंद राहत आहे. त्यामुळे वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागामध्ये चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. परीक्षेचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणार होत आहे.
खंडित वीजपुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, शेतीपंप बंद पडल्याने पिकांना पाणी देणेही कठीण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.
वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना
या निवेदनाची दखल घेत सभापती राम शिंदे यांनी तत्काळ महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील वीजपुरवठा तत्काळ सुरळीत सुरू करावा, याबाबत सूचना दिल्या आहेत.