कर्जत/ सिद्धटेक: डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करत असलेल्या विद्यार्थिनीने नुकत्याच झालेल्या ‘नीट’ परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पेपरफुटीनंतर पुन्हा घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत तिला 166 गुण मिळाले. अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून मानसिक तणावात तिने शनिवारी (दि. 25) सायंकाळी साडेचार वाजता घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
तिचे वडील आणि भाऊ आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेले होते. घरात आई होती; परंतु ती कामांत व्यस्त होती. ति तिच्या खोलीत अभ्यास करत होती. बराच वेळ तिचा आवाज किंवा हालचाल ऐकू न आल्याने आईने खोलीचा दरवाजा उघडून पाहिले तर तिने आत्महत्या केल्याचे दिसले.
आईने तत्काळ शेजाऱ्यांना आवाज दिला. पोलिसांना कळवण्यात आले. पोलिस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली. तिचे चुलते अण्णासाहेब सांगळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली. यानंतर रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुसाईड नोट
तिने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट करून ठेवल्याचे सांगण्यात आले. 21 जून 2026 या दिवशी झालेल्या नीट परीक्षेमध्ये मला 166 गुण मिळाले. आणि कटऑफ 177 आहे. अपेक्षित यश मिळाले नाही. यामुळे मला नैराश्य आले आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. या आत्महत्येसाठी माझे आई-वडील भाऊ यापैकी कोणालाही जबाबदार धरू नये, असे चिठ्ठीमध्ये लिहिले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तिचे चुलते अण्णासाहेब सांगळे यांनी सांगितले, की आपण क्वालिफाईड झालो नाही याची खंत तिला वाटत होती. यामुळे तिच्यामध्ये एक प्रकारचे नैराश्य आले होते. त्यातूनच तिने आत्महत्या केली आहे.