कर्जत-जामखेड: कर्जत-जामखेड मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आ. रोहित पवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, राज्य परिवहन महामंडळांतर्गत मतदारसंघातील १२ गावांमध्ये प्रवासी निवारे उभारण्याच्या कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक निवारे कर्जत-जामखेड मतदारसंघात उभारले जाणार आहेत. या कामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मतदारसंघातील ग्रामीण भागात एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना बसची प्रतीक्षा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बसथांब्यांवर निवाऱ्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना कडक ऊन, वारा आणि पावसात उभे राहावे लागत होते.
ही बाब लक्षात घेऊन आ. पवार यांनी मतदारसंघातील विविध गावांमध्ये प्रवासी निवारे उभारण्यासाठी शासनाकडे मागणी केली होती. यासाठी आ. पवार यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली होती.
तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर या कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली आहे.
यामध्ये कर्जत तालुक्यातील खेड, माही जळगाव, मांदळी, कोंभळी, रुईगव्हाण आणि कुळधरण या सहा गावांचा, तर जामखेड तालुक्यातील साकत, राजुरी, चोंडी, हळगाव, जवळके आणि जवळा या सहा गावांचा समावेश आहे. अशा एकूण १२ गावांमध्ये प्रवासी निवारे उभारण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ७५ ठिकाणांपैकी सर्वाधिक प्रवासी निवारे कर्जत-जामखेड मतदारसंघात उभारले जाणार असल्याने मतदारसंघाला याचा मोठा फायदा होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी आ. पवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहेत.