Karanji School Kitchen Garden Pudhari
अहिल्यानगर

Karanji School Kitchen Garden: करंजीतील शाळेत परसबाग उपक्रम; विद्यार्थ्यांना शेतीचे धडे

श्री नवनाथ विद्यालयात सेंद्रिय भाजीपाला लागवड; पोषण आहारासाठी ताज्या भाज्यांचा वापर

पुढारी वृत्तसेवा

करंजी: जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयास भेट देत गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी शालेय परसबाग उपक्रमाची पाहणी केली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत शालेय परिसर हरित आणि स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण केल्याचे समाधान व्यक्त केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेती, झाडे लावणे, त्यांची निगा राखणे आणि सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकविणे याचे ज्ञान मिळते. शालेय पोषण आहार विभागाच्या अश्विनी धामणे यांनीही कोलते यांच्यासोबत परसबागेची पाहणी केली. प्राचार्य संजय म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये परसबाग उपक्रम विशेष उल्लेखनीय आहे.

कोलते व धामणे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून परसबाग उपक्रमाबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी झाडांची लागवड कशी केली, त्यांना पाणी कसे दिले जाते, खत कोणते वापरले जाते आणि भाज्यांची वाढ कशी होते याबाबत जाणून घेतले. शाळेत पिकवलेला ताजा आणि पौष्टिक भाजीपाला शालेय पोषण आहारामध्ये वापरला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळतो.

स्वच्छता, वृक्षलागवड आणि गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता अंतर्गत शैक्षणिक उपक्रमांचीही पाहणी करण्यात आली. पर्यवेक्षक जयवंत पुजारी, स्वाती अहिरे, आप्पा आठरे, नवनाथ कदम ,बर्डे मामा, धोत्रे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

ताजा भाजीपाला पोषण आहारासाठी

शाळेच्या परिसरात विविध प्रकारचा भाजीपाला व फुलझाडांची लागवड केली आहे. या परसबागेत पालक, मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, फ्लॉवर,वांगी, मिरची आदी भाज्यांची लागवड करण्यात आली असून त्यांची नियमित देखभाल विद्यार्थी स्वतःच करतात. शाळेत पिकविलेला ताजा भाजीपाला शालेय पोषण आहारासाठी वापरला जातो.

परसबागेमुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार, पर्यावरणप्रेम आणि स्वच्छतेची जाणीव निर्माण होते. तसेच प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. शाळांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविणे अत्यंत आवश्यक आहे.
तृप्ती कोलते, गटशिक्षणाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT