Kanifnath Madhi Yatra Pudhari
अहिल्यानगर

Kanifnath Madhi Yatra: श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ महाराज यात्रा; रंगपंचमीला लाखो भाविकांची गर्दी

‘अलख निरंजन’च्या घोषात संजीवन समाधीचे दर्शन; यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ, काही भाविक जखमी

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: ‌‘अलख निरंजन‌’चा घोष; शंख, ताशा आणि डफाचा गजर अशा भारलेल्या वातावरणात लाखो भाविकांनी रविवारी रंगपंचमीला श्री क्षेत्र मढी येथे सुरू झालेल्या चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रेत संजीवन समाधीचे दर्शन घेतले. राज्यासह गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक यात्रेत दाखल झाले आहेत. रंगपंचमी हा नाथांचा समाधीदिन मानला जात असल्याने या यात्रेला महत्त्व आहे.

मंदिराच्या कळसाला हजारो देवकाठ्यांचे दर्शन घडविण्यात आले. मंदिराचे पूर्व व पश्चिम दरवाजे भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. मंदिर परिसरातील सुमारे चारशे एकर क्षेत्रात वाहने, नाथभक्त, दुकाने व विविध धार्मिक कार्यक्रम यांमुळे सर्व परिसर यात्रामय झाला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. फटाक्यांची आतषबाजी व रोषणाईमुळे गड परिसर लखलखीत झाला आहे. दर्शनबारीत भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या मोफत देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

यंदा धामणगाव पाथर्डी रोडवर सुमारे पन्नास एकर जागेवर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. विशी परिसरात, तसेच मढीतील श्रीराम चौक, निवडुंगा मढी, मढी धामणगाव पाथर्डी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसटी स्टँडदरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सकाळपासूनच अनेक रस्ते वाहनांच्या गर्दीने जाम झाले होते. दुपारी तीननंतर वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.

देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, माधुरी मरकड, अनिल साठे, दादासाहेब मरकड, महादेव कोकाटे, उत्तम मरकड, तानाजी ढसाळ, तानाजी शिंदे, मदन मरकड, उषा मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड यांच्यासह देवस्थान कर्मचाऱ्यांनी यात्रा नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, मढीतील तिसगाव रोडवर सरकार हॉटेलसमोर आग्या मोहोळ उठल्याने मधमाश्यांच्या हल्ल्यात दहा ते पंधरा भाविक जखमी झाले.

चोरट्यांचा धुमाकूळ

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेक भाविकांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल लंपास केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. मुंबई येथील जयराम नागो पवार आणि नवी मुंबई येथील निवृत्ती दत्तात्रय मेहेत्रे यांच्या गळ्यातील प्रत्येकी 20 ग्रॅम सोन्याची चैन, तसेच पुणे जिल्ह्यातील मनीषा स्वप्नील ठोसर यांचे 16 ग्रॅम व अन्य दोन महिलांचेही सोन्याचे मंगळसूत्र, मिरजगाव येथील मनिषा अनिल त्र्यंबक यांचे 16 ग्रॅम सोन्याचे मिनीगंठण चोरट्यांनी लंपास केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. पार्किंगमधून मोटारसायकल चोरत असल्याच्या संशयावरून गणेश भगवान तांदळे (रा. मिरजगाव, ता. कर्जत) याला दिनेश देविदास उन्हे (छत्रपती संभाजीनगर) यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. शेकडो मोबाईलही चोरीला गेल्याच्या तक्रारी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT