Kanifnath Madhi Yatra 2026 Pudhari
अहिल्यानगर

Kanifnath Madhi Yatra 2026: श्री क्षेत्र कानिफनाथ मढी यात्रा 8 मार्चपासून; भाविकांसाठी व्यापक तयारी

सीसीटीव्ही, ड्रोन, पार्किंग व वाहतूक व्यवस्थेसह सुरक्षा कडेकोट; 11 ते 17 मार्च मुक्तद्वार दर्शन व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: श्री क्षेत्र कानिफनाथ मढी येथे होणाऱ्या चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा महोत्सवासाठी कार्यरत विश्वस्त मंडळाने अवघ्या एका महिन्यात व्यापक आणि नियोजनबद्ध तयारी पूर्ण केली असून 8 मार्च 2026 पासून सुरू होणाऱ्या यात्रेसाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.

नवीन विश्वस्त मंडळाची निवड जानेवारीत होऊन प्रलंबित कामे मार्गी लावत यात्रेचे नियोजन वेगाने पूर्ण करण्यात आले आहे. वाढत्या भाविकांच्या संख्येचा विचार करून सुरक्षेला, स्वच्छतेला आणि वाहतूक नियंत्रणाला प्राधान्य देण्यात आले आहे. अशी माहिती कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांनी दिली.

मंदिर व परिसरात सध्या 72 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून पोलिस प्रशासनासाठी स्वतंत्र 32 कॅमेऱ्यांची सुविधा बसविण्यात येत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन ड्रोन कॅमेऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर व दर्शन रांगेचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची कार्यवाही सुरू आहे.

अग्निसुरक्षेसाठी अग्निशमन गाडीबरोबरच 40 फायर एक्स्टिंग्विशर उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. आपात्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका सज्ज असून आरोग्य विभागाच्या समन्वयातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

20 हजार चौ.फुटांचा हॉल, स्वतंत्र डायनिंग हॉल, किचन, निवारा हॉल, स्वच्छतागृहे आणि पक्की पार्किंग व्यवस्था उपलब्ध ठेवण्यात आली आहे. 13 खोल्यांचा भक्तनिवासही भाविक व स्वयंसेवकांसाठी खुला राहणार आहे.

धामणगाव रस्त्यालगत 38 एकर जागेत एस.टी. व चारचाकी वाहनतळ, छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ 2.5 एकर जागेत दुचाकी वाहनतळ, निवडुंगे रोडलगत 4 एकर जागेत चारचाकी वाहनतळ, श्रीराम चौकाजवळ दुचाकी वाहनतळ, मंगल कार्यालय परिसरात अस्थानधारकांसाठी पार्किंग यासोबतच बायपास रस्त्यांची दुरुस्ती करून पर्यायी मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. निवडुंगा मार्ग येण्यासाठी, तिसगाव मार्ग बाहेर जाण्यासाठी, पाथर्डी-धामणगाव-मढी मार्ग दुहेरी वाहतूक, मायंबा घाट फक्त दुचाकी वाहनांसाठी असणार आहे. एस.टी. स्टँड धामणगाव रस्त्यालगत हलविला आहे.

यात्रा कालावधीत गावठाण व शेतीपंपासाठी अखंड वीजपुरवठा व्हावा यासाठी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून तयारी करण्यात आली आहे. कचरा डेपो, कचरा वाहतूक गाडी, ड्रेनेज लाईन पूर्णत्वास नेण्यात आली आहे. अहिल्यानगर महापालिका व मढी ग्रामपंचायतीमार्फत फिरते शौचालय उपलब्ध राहणार आहेत. पशुहत्या बंदी व डीजे बंदीबाबत जनजागृतीसाठी फ्लेक्स व लाउडस्पीकरद्वारे सूचना दिल्या जाणार आहेत. अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्यपदार्थांची तपासणी होणार आहे.

दि. 11 ते 17 मार्च 2026 या कालावधीत मुक्तद्वार दर्शनाची सुविधा ठेवण्यात आली आहे. दि. 18 मार्च रोजी फुलबाग यात्रेदिवशी समाधी मंदिरात केवळ कावडधारकांना प्रवेश दिला जाणार आहे.या सर्व नियोजनात आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांचे प्रमुख अधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे.

देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांना निर्धारित वाहनतळाचाच वापर करावा, ओव्हरस्पीड टाळावे, मंदिर परिसरात धूम्रपान करू नये तसेच ट्रस्टच्या नावाखाली होणाऱ्या अनधिकृत वसुलीपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नाथ पालख्या व निशाण मिरवणुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन ट्रस्ट कडून करण्यात आले असून अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सूरसिंगराव पवार, माधुरी मरकड, अनिल साठे, दादासाहेब मरकड, महादेव कोकाटे, उत्तम मरकड, ॲड. तानाजी धसाळ, तानाजी शिंदे, मदन मरकड, उषा मरकड या विश्वस्तासह मुख्य कार्यकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड व सर्व कर्मचारी यात्रा नियोजनासाठी परिश्रम घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT