Kalsubai Landslide Pudhari
अहिल्यानगर

Kalsubai Landslide: कळसुबाईच्या पायथ्याशी भीषण भूस्खलन; घर गाडले, ११ पशुधनांचा मृत्यू, २१ जणांचे स्थलांतर

भंडारदरा पाणलोटात मुसळधार पावसाचा तडाखा; पांजरेसह आदिवासी भागातील ५२ घरांचे नुकसान, धरणातून ११,९२२ क्युसेक्स विसर्ग

पुढारी वृत्तसेवा

अकोले: भंडारदरा धरण पाणलोटात पाच- सहा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असतानाच, सकाळी 10 वाजेच्या सुमारास पांजरे गावाजवळील कळसुबाई शिखराजवळील डोंगराची दरड कोसळण्याचा प्रकार घडला. या घटनेत पांजरे परिसरातील एका घराचे नुकसान झाले, तर 11 पशुधनांचा मृत्यू झाला. दरम्यान गावातील चार कुटुंबाना नातेवाईकांकडे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांनी दिली.

भंडारदरा धरण पाणलोटात क्षेत्रातील घाटघर, साम्रद, रतनवाडी, घाटघर, उडदावणे, पांजरे परिसराला पाच- सहा दिवसांपासून अक्षरशः झोडपून काढलं आहे. त्यातचं पांजरे येथील गडदुआई परिसरात भूस्खलनाची घटना घडली. डोंगरावरील झाडे उन्मळून थेट ओढ्‌यातून वाहत पांजरे परिसरात आली. दरडीच्या दगडगोट्यांमुळे ओढ्यांनी मार्ग बदलला, तर अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे बांध फुटून भातशेती वाहून गेली आहे. या घटनेने परिसरात एकच हाहाकार उडाला.

हरि शांताराम उघडे यांच्या घरासह चार शेळ्या, चार बोकड व तीन लहान बकरे मातीखाली गाडली गेली. घटनेची माहिती भाऊ उघडे यांनी आ.डॉ. किरण लहामटे यांना दिली. त्यांच्या सुचनानंतर प्रशासन तातडीने मदत कार्यासाठी हजर झाले.

अकोल्याचे तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, मंडलधिकारी गणेश मंडलिक, नायब तहसीलदार किसन लोहरे, तलाठी श्रीमती डगळे, ग्रामसे्वक गभाले, स.पो.नि.किशोर पवार, पो.काँ. सचिन शिंदे आदीनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित कुटुंबाला गावातील नातेवाईकांकडे स्थलांतरीत करण्यात येऊन घटनास्थळाचा व दगावलेल्या पशुधनाचा अहवाल बनवला गेला.

भिंती कोसळल्या

भंडारदरा येथील मारुती दगडू खाडे व ज्ञानेश्वर मारुती खाडे यांच्या घराचे पत्रे उडाले. तर मुतखेल येथील विजय हरिभाऊ शिंदे यांचा बैल पावसामुळे दगावला. आंबेवंगण प्रकाश त्रिंबक धांडे यांचे घरचे छप्पर व भिंत पडली आहे. तर जहागिरदारवाडी येथे विठ्ठल वाळू खाडे, अर्जुना बहिरू खाडे, संतोष मंगळा खाडे, लालू काळू आढार, अंकुश संतू खाडे यांचे घराचे नुकसान झाले आहे. जोराच्या पावसामुळे आदिवासी भागातील कच्चे व पक्के अशा ५२ पडझड झालेल्या घराचे पंचनामे तलाठ्यानी करुन तहसीलदारांना अहवाल पाठविला आहे.

भंडारदरा पाणलोटात अतिवृष्टी

गेल्या तीन ते चार दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अतिवृष्टी होत असल्याने भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा शनिवारी सायंकाळी10,037 दलघफूट झाला असून धरणाच्या सांडव्यामधून 11922 क्युसेक्सने प्रवरा नदीमध्ये विसर्गसोडला जात आहे. गेल्या 24 तासांत भंडारदरा येथे 109 मिमी, पांजरे 189 मिमी, घाटघर 195 मिमी, रतनवाडी 155 मिमी, तर वाकी येथे 122 मिमी पाऊस झाला.

धोकादायक घरातील 21 जणांचे स्थलांतर

पांजरे येथील हरी शांताराम उघडे यांचे मालकीचे राहते पक्के घर पूर्णतः मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले आहे. तसेच सुभाष महादू उघडे व रामचंद्र महादू उघडे, विठ्ठल महादू उघडे यांच्या घरांना धोका निर्माण झाला असून, अशा ४ कुटुंबातील २१ जणांना पांजरे गावातील नातेवाईकांंच्या घरी स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT