नगर/एकरूखे: शिर्डीतील जमीन खरेदी व्यवहारात कल्पना खरात प्रत्यक्ष उपस्थित नव्हत्या. कल्पना खरातच्या बँक खात्याचा वापर अशोक खरातकडून होत असल्याने त्यांना व्यवहाराची माहिती असल्याचे म्हणता येणार नाही, असा बचाव खरातच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला.
तर कल्पना खरातचा व्यवहारात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निदर्शनास आणून देतानाच तिचा गुन्ह्यातील सहभाग नाकारता येणार नाही असा दावा करत खरातच्या अटकपूर्व जामिनाला सरकारी पक्षाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर राहाता न्यायालयाने कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला.
शिर्डीत जमीन हडपल्याचा तसेच सावकारीच्या गुन्ह्यात कल्पना खरातही आरोपी आहे. 31 मार्चपासून कल्पना खरात पसार असून राहाता न्यायालयात तिच्यावतीने वकिलामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. दोन वेळेस जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर बुधवारी त्यावर सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. सतीश पानगव्हाणे यांनी तर खरातच्या वतीने प्रशांत गिरी, फिर्यादी रावसाहेब गोंदकरच्या वतीने शुभम गोंदकर यांनी बाजू मांडली.
कल्पना खरात हिचा बँक व्यवहारात संबंध असल्यामुळे ताब्यात घेणे आवश्यक असल्याचे सरकारी वकील पानगव्हाणे व तपास अधिकारी निवांत जाधव यांनी न्यायालयात सांगतले.
अशोक खरातच्या कथित कृत्यांसाठी पत्नीला जबाबदार धरता येणार नाही. तसेच कल्पना खरातच्या बँक खात्यांचा वापर पतीकडून होत असल्याने आर्थिक व्यवहार माहिती होतेच असे म्हणता येणार नाही, असा बचाव खरातच्या वतीने प्रशांत गिरी यांनी केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. आता कल्पना खरात उच्च न्यायालयात धाव घेणार की पोलिसांना शरण येणार? याची उत्सुकता लागून आहे.
सात कोटीची उलाढाल, कल्पनाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
कल्पना खरात कोणतीही नोकरी करत नाही. तरीही त्यांच्या बँक खात्यातून सात कोटींचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय? असा प्रश्न तपासी अधिकारी निवांत जाधव यांनी न्यायालयात उपस्थित केला.
खरातच्या 57 मालमत्ता समोर आल्या असून त्यातील 40 टक्के मालमत्ता कल्पना खरातच्या नावावर आहेत. त्यामुळे अशोक खरातच्या व्यवहाराची माहिती नाही, हा कल्पना खरातचा दावा ग्राह्य धरता येणार नाही, अशी बाजू जाधव यांनी मांडली.
अशोक खरातवरील आरोप मान्य पण सहभाग नाही
अशोक खरातवरील आरोप मान्य असले तरी त्यात सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण कल्पना खरातच्या वतीने वकिलांनी न्यायालयासमोर दिले. कौटुंबिक जबाबदारी, मुलांचे संगोपन आणि पोलिसांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्याने आता कोठडीची गरज नाही. तपासात सहकार्यासोबतच रोज हजेरी लावण्याची तयारी दर्शवत कल्पना खरातच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली.