राहुरीच्या भरपेठेतील सराफ दुकान फोडले; तनपुरेंकडून पोलिस प्रशासनावर नाराजी  File Photo
अहिल्यानगर

Prajakt Tanpure: राहुरीच्या भरपेठेतील सराफ दुकान फोडले; तनपुरेंकडून पोलिस प्रशासनावर नाराजी

सीसीटिव्ही कॅमेरा तपासणी केली असता रात्री 2.30 वाजता चारचाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेर्‍यावर स्प्रे मारल्याचे दिसले.

पुढारी वृत्तसेवा

Jewellery shop burglary in Rahuri

राहुरी: राहुरी शहरातील भरबाजारपेठेतील सराफ व्यावसायिकाचे दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांसह राजकीय, सामाजिक व व्यापारी वर्गातील नागरीकांनी धाव घेत घटनास्थळी भेट दिली. तनपुरे यांनी पोलिस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत व्यापारी पेठेतील संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.

राजेंद्र सुरजमल भन्साळी यांच्या मालकीचे राहुरी शहरातील जुन्या पेठेत राहुरी मेडिकल समोर वर्धमान ज्वेलर्स नावाने दुकान आहे. भन्साळी हे नेहमीप्रमाणे दि. 13 जुलै रोजी रात्रीच्या वेळी दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी सकाळी दुकान फोडल्याचे त्यांना दिसले. (Latest Ahilyanagar News)

सीसीटिव्ही कॅमेरा तपासणी केली असता रात्री 2.30 वाजता चारचाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेर्‍यावर स्प्रे मारल्याचे दिसले. त्यानंतर चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडत आत प्रवेश केला. दुकानातील 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिणे तसेच 25 किलो वजनाचे चांदीचे दागिणे चोरून नेले. चोरट्यांनी दुकानाच्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यावर स्प्रे मारल्यानंतर डिव्हीआर मशिनही घेऊन गेल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती समजताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे, काँग्रेसचे नेते रावसाहेब चाचा तनपुरे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, माजी उपनगराध्यक्ष सुर्यकांत भुजाडी, व्यापारी असोसिएशनचे अध्यख प्रकाशसेठ पारख, संजीव उदावंत आदींसह नागरीकांनी धाव घेत भन्साळी यांची भेट घेतली.

पोलिस प्रशासनाकडून श्रीरामपूर विभागाचे उपविभागिय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुंजे, स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पोलिस हावलदार मनोज गोसावी, रमीजराजा आतार यांनी पाहणी केली. राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सहायक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ, उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, विजय नवले, प्रमोद ढाकणे, संदिप ठाणगे यांनी परिसरातील सीसीटिव्ही पाहणी करत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अहिल्यानगर पोलिस दलातील श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले. ‘सीमा’ नामक श्वान जागेवरच घुटमळल्याने चोरट्यांचा नेमका माग समजू शकला नाही.

भरबाजारपेठेत दागिणे दुकान फोडत लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याच्या घटनेने संपूर्ण शहरामध्ये व्यापारी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण केला जात आहे. बाजार पेठ सुरक्षित नसल्याने व्यापारी भयभित असून पोलिस प्रशासनाने तातडीने चोरट्यांचा शोध घेत गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.

पोलिसांनी वचक निर्माण करावा: तनपुरे

राहुरी शहरासह ग्रामिण भागामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अवैध धंद्याचे प्रमाण जेव्हा जेव्हा वाढले तेव्हा गुन्हेगारांनी डोके वर काढले असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने आपली खमकी भूमिका पार पाडत गुन्हेगारांवर आपला वचक निर्माण करावा. शहरातील भन्साळी यांच्या दुकानफोडी प्रकरणातील आरोपींचा तातडीने शोध लावावा अशी मागणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT