नगर तालुका: नगर तालुक्यासह मतदारसंघ व जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते, शेतकरी तसेच तरुणांचा कैवारी हरपला असल्याची भावना युवा नेते सुनील पवार यांनी व्यक्त केली.(Latest Ahilyanagar News)
स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांचा निधनानंतर जेऊर गाव बंद ठेवून त्यांना ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. बायजामाता व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने जेऊर येथील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्व. कर्डिले यांनी नेहमी सर्वसामान्य जनता, शेतकरी, तरुण, महिलांचे प्रश्न सोडविण्यात आपले आयुष्य घातले. गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांना ग्रामीण समस्यांची जाणीव होती. शेवटचा श्वासापर्यंत जनतेच्या सेवेत राहिले. त्यांच्या जाण्याने मतदारसंघ, तालुका, तसेच जिल्हा पोरका झाला आहे, असे भावनिक उद्गार पवार यांनी काढले.
सर्व प्रश्नांचे ’सोल्युशन’ असणारे ठिकाण म्हणजे शिवाजी कर्डिले होते. कर्डिले यांच्या दारात आलेला सर्वसामान्य नागरिक, शेतकरी कधीही मोकळ्या हाताने परत गेला नाही. प्रत्येकाच्या समस्यांचे निराकरण कर्डिले यांच्याकडून होत होते. त्यामुळे तीस वर्षांपासून अविरतपणे सुरू असणारा जनता दरबार आता सुना सुना वाटणार आहे. कर्डिले यांच्या निधनामुळे मतदारसंघाबरोबर तालुक्याचे मोठे नुकसान झाले असल्याचे पवार यांनी सांगितले.
माजी सभापती बाजीराव गवारे, बाजार समिती संचालक मधुकर मगर, माजी सरपंच विकास कोथिंबिरे, सोमनाथ हारेर, बापूसाहेब आव्हाड, सरपंच ज्योती तोडमल, उपसरपंच अनिता बनकर, बंडू पवार, राजेंद्र तोडमल, राजू दारकुंडे, बहिरवाडीचे सरपंच अंजना येवले, सरपंच बाजीराव आवारे, मच्छिंद्र आवारे, डॉ. राजेंद्र ससे,डोंगरगण माजी सरपंच कैलास पटारे, बबन बेल्हेकर, शंकर बळे, शरद तोडमल, स्वप्निल तवले, सुनील शिकारे, अनिल तोडमल, विजय पाटोळे, सतीश थोरवे, बायजामाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी कर्डिले यांना श्रद्धांजली वाहीली.
युवा नेते अक्षय कर्डिले यांना बळ देत आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी पोरका झालेल्या मतदारसंघाला आधार देण्याची गरज आहे. कर्डिले कुटुंबीयांच्या पाठीशी असंख्य कार्यकर्ते असून, कर्डिले कुटुंबीयांबरोबर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आधार देण्याचे काम आ. जगताप व विखे यांना करावे लागेल, असे पवार यांनी सांगितले.