नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळी लोड शेडिंग सुरू करण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षा सुरू असून सायंकाळी लोडशेडिंग करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचण निर्माण होत असल्यामुळे लोडशेडिंग बंद करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.
महावितरण कंपनीच्या जेऊर उपकेंद्रांतर्गत असणाऱ्या गावांमध्ये सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या दरम्यान सिंगल फेज लाईट सुद्धा बंद ठेवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लोड शेडिंगचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळच्या लोड शेडिंगचा परिणाम परीक्षेवर दिसून येण्याची भावना पालक व्यक्त करत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नियमित व अखंड वीज पुरवठा सुरु ठेवावा अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांमधून होत आहे.
जेऊर परिसरात वारंवार बिबट्याचे ही दर्शन झालेले आहे. बिबट्याकडून पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पशुधनाच्या शिकारी झालेल्या आहेत. त्याचबरोबर मानव वस्तीत देखील बिबट्याचा वावर आढळून आलेला आहे. बिबट्याची शिकार करण्याची मुख्यत: वेळ सायंकाळ व पहाटेच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येते.
त्यामुळे वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये सायंकाळी लाईट नसल्याने भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. जेऊर परिसरातील लोड शेडिंग बंद करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शंकर बळे, राजू दारकुंडे, संजय येवले, बंडू पवार, कैलास पटारे, सोमनाथ हारेर, बाजीराव आवारे, सुनील शिकारे, मच्छिंद्र आवारे, वसंत आठरे, राजेंद्र ससे, बाबासाहेब तोडमल, आदिनाथ बनकर, शरद तोडमल, नंदु केरु तोडमल यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.
जेऊर पंचक्रोशीतील लोडशेडींग तात्काळ बंद करण्याची गरज आहे. सायंकाळच्या वेळी लाईट नसणे हे सर्वांसाठीच अडचणीचे ठरत आहे. विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. लोडशेडिंग बंद करण्यासाठी लवकरच पंचक्रोशीतील शिष्टमंडळ युवा नेते अक्षय कर्डिले यांची भेट घेणार असून त्यांच्यासमोर परिस्थिती मांडण्यात येणार आहे.शंकर बळे, माजी उपसरपंच, ससेवाडी