शशिकांत पवार
नगर तालुका : तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जेऊर हे इतिहासातील अनेक लढायांचे साक्षीदार असलेले गाव. पहिल्या महायुद्धात गावातील 75 सैनिकांनी घेतलेला सक्रिय सहभाग. याची साक्ष देणारा ’शीलालेख’ आजही गावच्या मुख्य वेशीमध्ये दिसून येतो.
ब्रिटिशकालिन तसेच त्यापूर्वी देखील झालेल्या अनेक ऐतिहासिक लढायांमध्ये जेऊर गावचा उल्लेख आढळतो. आजही परिसरातील शेकडो तरुण सैन्यदलात सेवेत असून सीमेवर शत्रूंशी लढा देत आहेत.
तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळख असणार्या जेऊरला विविध ऐतिहासिक युद्धांच्या साक्षीदार असलेल्या ठिकाणांपैकी एक गाव म्हणून ओळखले जाते. जेऊर परिसरात अनेक महत्त्वपूर्ण लढाया झाल्या आहेत. भातोडी लढाई, तसेच महादजी शिंदे सरकारच्या काळातील आदिवासी भिल्ल समाजाच्या उठावाचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो. विविध लष्करी घडामोडींचा साक्षीदार असलेले जेऊर भागातील ऐतिहासिक स्थळे आणि स्मारके आजही त्या काळाच्या आठवणी जागवतात. गावाला इतिहासात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
सन 1914 ते 1919 यादरम्यान झालेल्या पहिल्या महायुद्धात जेऊर गावातील 75 सैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामधील काहीजण शहीद झाले तर काही गावामध्ये परत आल्याची नोंद शीलालेखावर आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यलढ्यात गावातील अनेक सैनिक सहभागी झाले होते. त्यातील काही आजही त्या घटनांना उजाळा देत आहेत. तसेच 1962 मध्ये भारत चीन युद्ध, 1965 मधील भारत-पाकिस्तान युद्ध, तर 1971 च्या बांगलादेश मुक्ती संग्रामामध्ये गावातील अनेक सैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्या युद्धातील चित्त थरारक घटना आजही त्यांच्याकडून सांगण्यात येतात. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धातदेखील जेऊर पंचक्रोशीतील सैन्य दलात नोकरीस असणार्या अनेकांचा सहभाग होता.
गावामधील बाबासाहेब वाघमारे या जवानाने देशासाठी आपले प्राण बलिदान केले. युद्धात शहीद झालेल्या वाघमारे यांचे स्मारक गावामध्ये आहे. जेऊर गावचा यात्रोत्सव असल्याने सैन्यदलातील अनेकजणांनी सुट्टी घेतली होती. काही आपल्या विवाहानिमित्त सुट्टीवर आले होते. परंतु सीमेवर भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर सुट्टीवर आलेल्या जवानांना तत्काळ हजर होण्याचे आदेश मिळाले. यात्रोत्सव तसेच नव्यानेच विवाह झाला असला तरी कुटुंब सोडून देशासाठी गावातील अनेक सैन्यदलातील तरुण सीमेवर रवाना झाले. कुटुंबीयांनी ही औक्षण करून विजयीभव आशीर्वाद देत देशाच्या संरक्षणासाठी मुलाला, पतीला युद्धासाठी पाठवून मनाचा मोठेपणा दाखवला.
युद्धाला पूर्णविराम मिळाला असला, तरी सीमेवरील तणावग्रस्त परिस्थिती पाहता सैन्यदल डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करीत आहे. जेऊर परिसरातील सैन्य दलात असणारे तरुण गुजरात, कच्छ, राजस्थान, पहलगाम, जम्मू काश्मीर येथील सीमेवर कार्यरत आहेत. सैन्यदलात भरीव कामगिरी करणार्या अनेक सैनिकांचा ग्रामस्थांना अभिमान वाटतो. निवृत्तीनंतर त्यांची भव्य दिव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात येत असतो.