पाथर्डी: पाथर्डी आणि शेवगाव शहराची वाढत्या पाण्याची गरज लक्षात घेऊन राबविण्यात येत असलेल्या जायकवाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची कामे वेगाने सुरू असून, लवकरच दोन्ही शहरांना नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आ. मोनिका राजळे यांनी व्यक्त केला.
योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह जायकवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. या वेळी पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्षा मंगल कोकाटे, नगरसेवक नंदकुमार शेळके, बंडूशेठ बोरुडे, डॉ. मृत्युंजय गर्जे, बजरंग घोडके, अमोल गर्जे, अॅड. प्रतीक खेडकर, डॉ. जगदीश मुने, प्रतीक नांगरे, अजय भंडारी, संजय भागवत, संजय देशमुख, सुभाष बोरुडे, अजिनाथ मोरे, संदीप पवार, धनंजय चितळे, मनीषा उदमले, वंदना टेके, ज्योती शर्मा, सचिन वायकर, बबलू खोर्दे, तसेच पाथर्डीचे मुख्याधिकारी संतोष लांडगे आणि शेवगावच्या मुख्याधिकारी विजया घाडगे उपस्थित होत्या.
पाहणीदरम्यान आ. राजळे यांनी संबंधित अधिकारी व काम करणारे ठेकेदार, प्रतिनिधी यांच्याकडून कामाचा सविस्तर आढावा घेतला. योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींबाबत चर्चा करून त्या तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता निर्धारित वेळेत योजना पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आ. राजळे म्हणाल्या की, पाथर्डी आणि शेवगाव या दोन्ही शहरांचा विस्तार झपाट्याने होत आहे. वाढती लोकसंख्या, नव्या वसाहती आणि भविष्यातील पाणीगरजा लक्षात घेऊन या योजनेची क्षमता वाढविण्यात आली आहे.
शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा पोहोचावा, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने कामे केली जात आहेत. जायकवाडी येथे पाथर्डी योजनेसाठी उभारण्यात येणाऱ्या जॅकवेलचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. पुढील दोन महिन्यांत जॅकवेलला जोडण्यात येणाऱ्या पाइपलाइनचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यास तात्पुरत्या स्वरूपात फ्लोटिंग पंपाच्या माध्यमातून पाणी उपसा करून पुरवठा सुरळीत ठेवण्याचा पर्यायही प्रशासनाने तयार ठेवला आहे. शेवगाव शहरातील पाइपलाइन टाकण्याचे काही काम अद्याप शिल्लक असले, तरी पाथर्डी शहरातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत.
दोन्ही शहरांच्या दैनंदिन पाणीगरजांचा विचार करता शेवगावला सुमारे ९० लाख लिटर, तर पाथर्डीला ६३ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, सध्या उपलब्ध यंत्रणा आणि स्रोतांमुळे अपेक्षित प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. जायकवाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ही तूट भरून निघेल आणि नागरिकांना दीर्घकालीन दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेवगाव योजनेसंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारच्या काही आवश्यक परवानग्या प्रलंबित असून, त्या मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
संबंधित सर्व विभागांच्या समन्वयातून उर्वरित प्रक्रिया लवकर पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाथर्डी आणि शेवगावच्या नागरिकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, ती पूर्णत्वास गेल्यानंतर अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात करता येणार आहे. त्यामुळे या योजनेची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
एकत्रितपणे प्रयत्नशील
पाथर्डी आणि शेवगावच्या नागरिकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, ती पूर्णत्वास गेल्यानंतर पाणीटंचाईच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात करता येणार आहे. त्यामुळे या योजनेची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे प्रयत्नशील असल्याचे आ. मोनिका राजळे यां नी सांगितले.