Jayakwadi Dam Pudhari
अहिल्यानगर

Jayakwadi Dam Water Storage: जायकवाडीत पाणीसाठ्याची झपाट्याने वाढ; नगरवरील समन्यायी पाणीवाटपाची टांगती तलवार दूर होण्याची चिन्हे

धरण ७३.२३ टक्के भरले; उपयुक्त पाणीसाठा ४९.१६ टीएमसीवर, नगर जिल्ह्यातील धरणांमध्येही ७२.७१ टक्के जलसाठा

पुढारी वृत्तसेवा

नगर: नाशिक जिल्ह्यात गेल्‍या आठ दहा दिवसांपासून पाऊस सुरु असल्‍याने जायकवाडी धरणाच्‍या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. आजमितीस हे धरण ७३.२३ टक्‍के भरले असून, उपयुक्‍त पाणीसाठा ४९.१६ टीएमसी नोंदविला गेला आहे. त्‍यामुळे जिल्ह्यावरील समन्‍यायी पाणीवाटपाची टांगती तलवार दूर होण्‍याची शक्‍यता वाढली आहे. दरम्‍यान, जिल्ह्यातील पाणीसाठा ७२.७१ टक्‍के इतका नोंद झाला आहे.

यंदा जून महिन्‍यात पावसाने जवळपास हुलकावणी दिली. जेमतेम ६१ टक्‍के पावसाची नोंद झाली. धरणांच्‍या पाणलोट क्षेत्रात पाऊस फिरकलाच नव्‍हता. त्‍यामुळे जिल्ह्यातील धरणात पाणी आवक झालीच नव्‍हती. जुलै महिन्‍यात मात्र पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रातदेखील पहिल्‍या व तिसर्‍या आठवड्यात पावसाने चांगलाच जोर धला. त्‍यामुळे भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा आदी धरणांची पाणीपातळी वाढण्‍यास मोठी मदत झाली.

आढळा ओव्‍हरफ्‍लो झाले असून, भंडारदरा व निळवंडे तांत्रिकदृष्‍ट्या भरले आहे. भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा, सीना, मांडओहळ, घाटशीळ, खैरी व विसापूर आदी लहान मोठ्या धरणांत आजमितीस ७३ टक्‍के म्‍हणजे ३७ हजार १६१ दलघफू इतका पाणीसाठा उपलब्‍ध आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्‍या पाणीसाठ्याकडे नगरकरांच्‍या नजरा असतात. या धरणाचे पाणलोट क्षेत्र नगर आणि नाशिक जिल्‍हा आहे.

जायकवाडी धरणात २० जुलैपर्यंत जवळपास २५ टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठा होता. गेल्‍या आठदहा दिवसांत नाशिक जिल्ह्यासह अकोले तालुक्‍यात जोरदार पाऊस होऊन गोदावरी आणि प्रवरा नद्या दुथडी वाहू लागल्‍या. त्‍यामुळे या धरणात मोठी वाढ झाली असून, मंगळवारी (दि.२८) सायंकाळी ७ वाजता उपयुक्‍त पाणीसाठा ४९.१६ टीएमसीवर पोहोचला आहे.

१५ ऑक्‍टोबरला निर्णय

जायकवाडीची क्षमता १०२.७३ टीएमसी असून, उपयुक्‍त पाणीसाठा ७६.६७ टक्‍के इतका आहे. या पाणीसाठ्याच्‍या ६५ टक्‍के म्‍हणजे ५० टीएमसी पाणीसाठा उपलब्‍ध झाल्‍यास नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्‍याची गरज नाही. मात्र, यासाठी १५ ऑक्‍टोबर रोजीची धरणांतील पाणी परिस्‍थिती विचारात घेतली जात आहे. मात्र, सध्‍यातरी ५० टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठा उपलब्‍ध झाल्‍यामुळे जिल्ह्यात समाधानाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT