जामखेड: जामखेड-सौताडा रस्त्यात दडलंय काय? असा प्रश्न आत्ता जामखेडकर विचारताना दिसत आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून काम सुरू असून, मुख्य रस्ता असलेला खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला अजूनही मुहूर्त लागत नसल्याने पावसामुळे या रस्त्याची घसरगुंडी झाली आहे. यात घसरून अनेक वाहन जखमी झाले आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार आदी दिग्गज नेते असताना देखील या रस्त्याच्या कामाबाबत ते चकार शब्द बोलत नाहीत. त्यामुळे पदाधिकारी, प्रशासन, ठेकेदाराची निष्क्रियता चव्हाट्यावर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मोजमाप न झाल्याने रस्त्याचे काम रखडलेले असल्याचे बोलले जात आहे. (Ahilyanagar News Update)
पावसाळा सुरू झाला तरी काम अपूर्णच राहिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम आजही मोजणीच्या फेर्यात अडकले आहे. विशेषतः जामखेड-सौताडा रस्त्याचे मोजमाप आणि अतिक्रमण हटविण्याचे काम केवळ कागदावरच सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
मोजणी करायला भूमिअभिलेखच्या अधिकार्यांना महिना लागला तरी अजून मोजणींपूर्ण झाली नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. यातून प्रशासन व ठेकेदाराची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे.
प्रशासनाने 28 मार्चपूर्वी अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका, भूमिअभिलेख आणि पोलिस प्रशासन यांची संयुक्त कारवाई आखली होती. मात्र, 24 मे उजाडली तरी प्रत्यक्ष कारवाईचा मागमूसही नाही. रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत बांधकामे, मोजमापाची प्रतीक्षा आणि यंत्रणांची उदासीनता, यामुळे संपूर्ण प्रकल्प ठप्प झाला आहे.
रस्ताकाम न केल्यास आंदोलनाचा इशारा
दोन वर्षांपासून शहारातील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले आहे. या कामामुळे नागरिकांसह वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्या पावसामुळे रस्ता चिखलमय बनला आहे. प्रशासनाने तात्काळ रस्त्याचे काम 29 मेपर्यंत पूर्ण न केल्यास क आंदोलन करण्याचा इशारा श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे तालुकाप्रमुख पांडुराजे भोसले यांनी दिला.